मशागत करुनही पेरा उगवलाच नाही… राजू शेट्टींचा दारुण पराभव का झाला?

मशागत करुनही पेरा उगवलाच नाही… राजू शेट्टींचा दारुण पराभव का झाला?

2004 ला आमदार, 2009 ला खासदार, 2014 ला खासदार… शरद जोशी (Sharad Joshi) या शेतकरी नेत्याचा वारसा सांगत राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी शेतकरी संघटनेची बांधणी केली. आंदोलन, चळवळ उभी करत त्यांनी निवडणुकीच्या राजकारणात उडी घेतली. यशही मिळाले. जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभा असे करत राजू शेट्टी एक-एक पायरी वर चढत होते. दहा वर्षांपूर्वीपर्यंत शेट्टी नावाचे वादळ पश्चिम महाराष्ट्रातील कारखानदारांना धडकी भरवत होते, तर शेतकऱ्यांना आपल्यासाठी झगडणारा, रस्त्यावर उतरणारा, आंदोलन करणारा, केसेस अंगावर घेणारा नेता म्हणून आशेचा किरण वाटत होते. (What are the reasons for Raju Shetty’s defeat in 2024 Lok Sabha Elections?)

पण 2019 मध्ये शेट्टींचा पराभव झाला. तो जिव्हारी न लावता शेट्टी मैदानात राहिले. पाच वर्ष मतदारसंघाची मशागत केली. हिरव्या पिकाचं स्वप्न उराशी बाळगत राहिले. आता पाऊस येणार आणि शिवार फुलणार या आशेवर राहिले. पण 2024 च्या निवडणुकीत राजू शेट्टी नावाचे वादळ मतदारसंघात पालापाचोळ्यासारखं उडून गेलं. पाच वर्ष जमिनीची मशागत करुन थोडा सुद्धा पेरा उगवला नाही. थोडीशी तरी उगवण अपेक्षित असताना सारच्या सार रानचं कोरडं राहिलं. नेमकी राजू शेट्टी यांच्या पराभवाची काय कारणे आहेत तेच आपण पाहणार आहोत….

‘बजरंग बली पावला’, जयंत पाटलांनी सोनवणेंचं अभिनंदन करताच पवारही हसले

महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाची चर्चा सुरु होण्यापूर्वीच उद्धव ठाकरे यांनी हातकणंगले राजू शेट्टी यांना सोडायचे ही तयारी केली होती. जागा शेट्टींना सोडायचीच म्हणून तिथे आघाडीकडून उमेदवाराचीही तयारी केली नव्हती. धैर्यशील माने एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्याने त्यांच्याबद्दलची तयार झालेली नाराजी आणि आघाडीची ताकद यामुळे शेट्टी एकतर्फी निवडणूक मारतील असे मतदारसंघात बोलले जाऊ लागले. पण मागील निवडणुकीत आघाडीसोबत गेलो आणि पराभव झाला. त्यावेळी ज्यांच्याविरोधात आंदोलन केले, त्यांच साखर कारखानदारांसोबत गेल्याने आपला पराभव झाल्याची भावना कार्यकर्त्यांची झाली होती.

त्यातही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आपले काम करत नाहीत, असा अनुभव त्यांना 2019 च्या निवडणुकीत आला होता. त्यामुळेच शेट्टी यांनी यावेळी एकला चलो रे हीच भूमिका घेतली. पण हाच निर्णय त्यांच्यासाठी राजकीय आत्महत्या ठरला. गेल्या पाच वर्षांमध्ये राजू शेट्टी यांच्याकडे कार्यकर्ते शिल्लक राहिलेले नाहीत. 2014 ते 2019 अशी पाच वर्षे सत्तेच्या वळचणीला असल्याने त्यांच्या आंदोलनांची धार बोधट होती. त्यानंतरच्या काळात सदाभाऊ खोत, रविकांत तुपकर यांच्यासारखे नेते शेट्टींपासून दुरावले. स्वबळावर लढण्यासारखी फौज स्वाभिमानी संघटनेकडे शिल्लक राहिली नाही.

त्यामुळे आघाडीसोबत बोलवत असेल तर जाऊया, असा सल्ला संघटनेतील काही पदाधिकाऱ्यांनी शेट्टींना दिला होता. पण, शेट्टी यांनी एकला चलो रे ची भूमिका घेतली आणि पराभवाचे तोंड बघावे लागले. गट-तट आणि पक्षातील अंडर करंट त्यांना विजयाच्या स्पर्धेतही आणू शकला नाही. अनेक गावांमध्ये कशी बशी तीन आकडी मतांची मजल त्यांना गाठता आली.राजू शेट्टी यांचा शिरोळ व वाळवा तालुक्यावर भरवसा होता. शिरोळमधील किमान १ लाख १० हजार मते आपल्याला मिळतील, अशी अपेक्षा त्यांना होती. पण, स्वतःच्या होमपिचवरच त्यांचा मोठा फटका बसला. वाळव्यानेही अपेक्षित साथ दिली नाही. पूर्णपणे बांधणी केलेला मतदारसंघ साबण निसटावा तसा निसटला.

अजितदादांचे आमदार परतणार का? जयंत पाटलांनी एकाच वाक्यात सांगितल, ‘माझा मोबाईलचा वापर….’

या निवडणुकीत राजू शेट्टी यांचा तब्बल पावणेचार लाखांहून अधिक मतांनी पराभव झाला आहे. पराभवापेक्षा हे अंतरच स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांच्या प्रचंड जिव्हारी लागले आहे. जो उमेदवार विजय़ाच्या शर्यतीत होता तो इतक्या मतांनी कसा काय पराभूत होवू शकतो हे कार्यकर्त्यांच्या आकलनापलीकडे गेले आहे. पण इचलकरंजीतील धैर्यशील माने आणि शाहुवाडीचे सरुरडकर या दोन टोकाच्या उमेदवारांनी शेट्टी यांना दोन्हीकडे लीड घेऊ दिले नाही. वाळवा आणि शिराळा या दोन्ही मतदारसंघांमध्ये सरुडकरांना आघाडी मिळाली. तर धैर्यशील माने यांना हातकणंगले, शिरोळ आणि इचलकरंजी या तिन्ही मतदारसंघांमध्ये आघाडी मिळाली. त्यामुळे शेट्टी थेट तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. 2009, 2014 आणि 2019 या तिन्हीवेळी मिळवलेली स्वतःची मतेही त्यांना राखता आली नाहीत.

आता राजकीय भवितव्याच्या दृष्टीने त्यांना नव्या त्वेषाने पुनर्बांधणी करावी लागेल. ते यातून पुनश्चः हरिओम कसे करतात यावरच स्वाभिमानीचे आणि चळवळीचे भवितव्य अवलंबून आहे हे नक्की.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube