Women Commission : महिलांसाठी उल्लेखनीय कार्य केलेल्यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
मुंबई : राजकारण, समाजकार्य, प्रशासन क्षेत्रात महिलांसाठी उल्लेखनीय कार्य केलेल्यांचा राज्य महिला आयोगाच्या (Women Commission) ३० व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. हा सोहळा बुधवार २५ जानेवारी रोजी दुपारी २ ते ४ या वेळेत सह्याद्री अतिथीगृह येथे होणार आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक म्हणून काम करत असताना महिलांबाबतच्या खटल्यात संवेदनशीलतेने उल्लेखनीय कार्य केलेले पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे (Shailesh Balakwade), पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख (Abhinav Deshmukh), विधवा प्रथा बंदीचा ठराव करत ऐतिहासिक पाउल उचलणारी हेरवाड ग्रामपंचायत (Herwad Gram Panchayat), सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी (Heramb Kulkarni) यांचा यावेळी सन्मान करण्यात येणार आहे.
राज्य महिला आयोग आणि फेसबुक यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांच्या सुरक्षिततेकरिता राबविण्यात येणाऱ्या ‘मिशन ई सुरक्षा’ अभियानाचा शुभारंभ यावेळी होणार आहे.
पुढील एक वर्ष हे अभियान राबविण्यात येणार असून यात महिलांमध्ये इंटरनेट, सायबरच्या सुरक्षित वापराबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.
फेसबुक महाराष्ट्रात पहिल्यांदाच अशा प्रकारे शासकीय यंत्रणेशी करार करत जनगागृतीपर मोहीम हाती घेत आहे. आयोगाकडे गेल्या काही वर्षात वाढलेल्या आँनलाईन फसवणूक, सायबर गुन्हे अशा तक्रारी पाहता भविष्यात महिलांना सायबर साक्षर करण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत आहे.