कुंभमेळ्याचा 591 कोटींचा बनावट वर्क ऑर्डर घोटाळा; गिरीश महाजनांचा नातेवाईकच आरोपी
नाशिक कुंभमेळ्याच्या 591 कोटींच्या बनावट वर्क ऑर्डर प्रकरणात गिरीश महाजनांच्या नातेवाईकासह तिघांना अटक; पोलिसांचा तपास सुरू.
Kumbh Mela 591 crore work order scam : नाशिकमध्ये होणाऱ्या आगामी कुंभमेळ्याच्या कामांमध्ये मोठा गैरप्रकार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. विभागीय आयुक्तांच्या बनावट स्वाक्षरीचा वापर करून तब्बल 591 कोटी रुपयांच्या पाच वर्क ऑर्डर तयार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात पोलिसांनी गिरीश महाजन यांच्या मतदारसंघातील तीन जणांना अटक केली आहे. त्यापैकी एक जण कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांचा नातेवाईक असल्याचे समोर आले आहे.
स्वातंत्र्यदिनी ‘वंदे मातरम्’ म्हणणे सक्तीचे; राज्य सरकारचा आदेश
पोलिसांच्या माहितीनुसार, बनावट कागदपत्रे आणि वर्क ऑर्डर तयार करून 3 कोटी 5 लाख रुपयांची फसवणूक केल्याचेही तपासात समोर आले आहे. विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या बनावट स्वाक्षरीचा वापर करून कुंभमेळ्याशी संबंधित कामांच्या वर्क ऑर्डर तयार करण्यात आल्या. कागदोपत्री या वर्क ऑर्डरची एकूण किंमत 591 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.
या प्रकरणात जळगाव जिल्ह्यातील तनय अनंत महाजन आणि नरेंद्र महाजन यांच्यासह तिघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आतापर्यंत पाच बनावट वर्क ऑर्डर पोलिसांच्या हाती लागल्या आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
गिरीश महाजन म्हणाले, ‘नातेवाईक असला तरी गय करणार नाही’
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना गिरीश महाजन यांनी संबंधित आरोपी आपला दूरचा नातेवाईक असल्याचे सांगितले. मात्र, त्याच्यावर यापूर्वीही काही गुन्हे दाखल असल्याचे त्यांनी म्हटले.
“तो माझा दूरचा नातेवाईक आहे, पण तो फार वाया गेलेला आहे. त्याच्यावर पूर्वीपासून काही गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणात आणखी सात-आठ जण समोर येण्याची शक्यता आहे. दोषी आढळणाऱ्यांवर अतिशय कडक कारवाई केली जाईल,” असे महाजन यांनी सांगितले.
कुंभमेळ्याच्या नियोजनावर आधीपासूनच प्रश्न
नाशिक कुंभमेळ्यासाठी सरकारने सुमारे 35 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. मात्र, या नियोजनावरून विरोधक तसेच साधू-महंतांकडून यापूर्वीच प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वी कुंभमेळ्याच्या कामासाठी होणाऱ्या वृक्षतोडीच्या मुद्द्यावरूनही वाद निर्माण झाला होता.
IPL 2027: हार्दिक पंड्याच्या ट्रेडची चर्चा; गुजरात टायटन्सकडे ठेवली होती कर्णधारपदाची अट?
आता कुंभमेळ्याच्या कामांच्या नावाने बनावट वर्क ऑर्डर आणि आर्थिक फसवणुकीचा प्रकार समोर आल्याने सरकारसमोरील अडचणी वाढल्या आहेत. विशेष म्हणजे, कुंभमेळ्याची जबाबदारी असलेल्या मंत्री गिरीश महाजन यांच्या नातेवाईकाचे नाव या प्रकरणात समोर आल्याने राजकीय चर्चेलाही उधाण आले आहे.