पुण्यातील विषारी दारू प्रकरणाची बीडमध्ये पुनरावृत्ती; परळीमध्ये घडली धक्कादायक घटना

पुण्यातील दुर्घटनेनंतर तिथल्या दारू विक्रेत्यांवर थेट सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

News Photo   2026 06 22T155132.496

पुणे शहरातील विषारी हातभट्टी दारू मृत्यू प्रकरणाची (Beed) पुनरावृत्ती बीडच्या परळी शहरात घडली आहे. परळीतील साठे नगर भागात एका तरुण युवकाचा विषारी हातभट्टी दारू पिल्याने मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण बीड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. संतप्त नातेवाईक आणि महिलांनी थेट परळी पोलिस स्टेशनमध्ये धाव घेत ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून अवैध हातभट्टी दारूची विक्री उघडपणे सुरू आहे. दारूबंदी व्हावी यासाठी स्थानिक महिला आणि नागरिकांनी अनेक वेळा पोलीस प्रशासनाला निवेदने दिली, मोर्चे काढले. मात्र, स्थानिक पोलीस प्रशासनाने या तक्रारींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे. पोलिसांच्या याच हलगर्जीपणामुळे आज एका निष्पाप तरुण युवकाला आपला जीव गमवावा लागल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. या तरुणाच्या मृत्यूला परळी पोलिसच पूर्णपणे जबाबदार असल्याचा थेट आरोप संतप्त नागरिकांनी केला आहे.

बीड जिल्ह्यावर पाणीटंचाईचे संकट; 14 लघु प्रकल्प कोरडे, 71 प्रकल्प मृतसाठ्यात

पुण्यातील दुर्घटनेनंतर तिथल्या दारू विक्रेत्यांवर थेट सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच धर्तीवर परळीतील साठे नगर भागातील अवैध दारू विक्रेत्यांवरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी साठे नगरमधील महिला आणि नागरिकांनी पोलीस स्टेशनमध्ये निवेदन दिले आहे. जोपर्यंत दोषींवर कडक कारवाई होत नाही आणि हा परिसर दारूमुक्त होत नाही, तोपर्यंत मागे हटणार नसल्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे.

साठे नगर भागातील नागरिकांनी अवैध दारू धंद्यांविरोधात वारंवार आवाज उठवला आहे. पोलिसांना याबाबत अनेकदा लेखी आणि तोंडी माहिती देण्यात आली होती. मात्र, पोलिसांनी वेळीच ठोस कारवाई केली नाही. आज एका तरुणाचा बळी गेला आहे, याला पोलिसांचे दुर्लक्षच कारणीभूत आहे. दोषी दारू विक्रेत्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे, अशी मागणी नगरसेवक नितीन रोडे यांनी केली आहे.

follow us