बेकायदेशीरपणे आदिवासीच्या जमिनी लाटणाऱ्यांवर कारवाई होणार; महसूल मंत्री विखेंचे आदेश
Revenue Minister Radhakrishna Vikhe : राज्यातील आदिवासी जमिनी हस्तांतरण प्रकरणी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठन करून चौकशी करणार असल्याची माहिती राज्याचे महसूल मंत्री विखे पाटील यांनी विधानपरिषद सभागृहात दिली. जिथं- कुठं आदिवासींची जमिनी लाटल्या असतील त्यावर कडक कारवाई जाईल, असे स्पष्ट निर्देश त्यांनी यावेळी दिले.
पावसाळी अधिवेशनात विधानपरिषमध्ये नंदूरबार येथील आदिवासी व्यक्तीची जमीन बिगर आदिवासी केल्याचा प्रश्न उपस्थित केला असताना महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उत्तर देताना माहिती सदरची माहिती दिली. केवळ एकाच प्रकरणी नाही तर कोकण, नागपूर, अमरावती आणि नाशिक विभागातील सुद्धा अदिवासी जमिनीबाबत चौकशी केली जाईल असंही महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यावेळी म्हणाले.
आदिवासी बांधवांना न्याय मिळावा आणि त्यांच्या जमिनीचे संरक्षण व्हावे यासाठी येत्या 15 दिवसांत राज्यातील विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करून त्यांना अहवाल सादर करण्यास सांगितले जाईल आणि जिथे कुठे आदिवासी जमिनीबाबत गैरव्यवहार झाले असतील त्यावर शासनाच्या मार्फत कडक कारवाई केली जाईल असे स्पष्ट आदेश महसूल मंत्री विखे पाटील यांनी दिले.
मंत्री विखे पाटील म्हणाले की, शासन हे नेहमीच आदिवासी बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे. त्यांच्या जमिनीचं सरंक्षण करण्यास कटिबद्ध आहे. यामुळे कुठेही हलगर्जीपणा खपून घेतला जाणार नाही. चौकशीमुळे राज्यातील आदिवासी बांधवांना मोठा दिलासा मिळेल असा विश्वास मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केला.