मराठा आरक्षण आंदोलकच आरोपीच्या पिंजऱ्यात : पोलिसांवरील हल्ल्याप्रकरणी 200 जणांवर गुन्हे दाखल

मराठा आरक्षण आंदोलकच आरोपीच्या पिंजऱ्यात : पोलिसांवरील हल्ल्याप्रकरणी 200 जणांवर गुन्हे दाखल

जालना : आंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात सुरु असलेले मराठा आरक्षण आंदोलन (Maratha reservation agitation) तीव्र होण्याची शक्यता आहे. काल झालेल्या अमानुष लाठीचार्जनंतर आता पोलिसांवर दगडफेक केल्याचा आरोप करत 200 आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शासकीय कामकाजात अडथळा आणणे, पोलिसांवर हल्ला करणे अशा विविध आरोपांखाली गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याच दगडफेकीनंतर आंदोलकांवर अमानुष लाठीचार्ज झाला होता. यात 20 आंदोलक जखमी झाले आहेत. (After the lathi charge, now cases have been registered against 200 protesters for allegedly pelting stones on the police)

गुन्हे दाखल झाल्यानंतर बोलताना जरांगे पाटील म्हणाले, आहो आम्ही शासकीय कामकाजात अडथळा आणलेला नाही. हे चुकीची कारण का करत आहात तुम्ही. आमच्या लोकांनी हल्ला केलेला नाही. आमचीच डोकी फुटली आहेत. त्यामुळे गुन्हा दाखल करुन आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करु नये, हे शिंदे-फडणवीस यांना हे जड जाईल. आंदोलनाला लागलेलं हिंसक वळण हे मराठा समाजावरील डाग आहे तो तुमच्या दोघांमुळेच लागला आहे, असेही जरांगे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून म्हणाले.

शरद पवार घेणार आंदोलकांची भेट :

दरम्यान, जखमी आंदोलकांची भेट घेण्यासाठी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आज (2 सप्टेंबर) जालन्याला जाणार आहेत. सकाळी साडेअकराच्या सुमारास पवार औरंगाबाद विमानतळावर दाखल होतील. त्यानंतर साडेबाराच्या सुमारास अंबड रुग्णालय आणि वादीगोदरी रुग्णालयाला भेट देतील. त्यानंतर आंदोलन सुरु असलेल्या अंतरवली सराटी गावाला देखील भेट देणार आहेत. तिथून राजेश टोपे यांच्या कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्यावर त्यांची पत्रकार परिषदही होणार आहे.

नेमकं काय घडलं होतं ?

मराठा आरक्षण व इतर मागण्यांसाठी जालन्यातील अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे आंदोलन सुरू झाले होते. मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली उपोषण आंदोलन सुरू होते. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी या तालुक्यातील वीस ते बावीस गावांमध्ये कडकडीत बंद पुकारण्यात आला होता. या आंदोलनाला पाठिंबा वाढू लागला होता. बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील अनेक गावांतही बंद पुकारण्यात आला. येथील तरुणांनी आंदोलनाच्या समर्थनार्थ सराटी गावांत दुचाकी रॅली काढण्यात आली होती.

या आंदोलनाची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही यांनी घेतली होती. गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे यांच्याशी मोबाइलद्वारे संपर्क साधला होता. परंतु जरांगे यांनी उपोषण मागे घेतले नाही. शुक्रवारी अनेक गावांतून पाठिंबा वाढू लागला होता. त्यामुळे शुक्रवारी पोलिसांनी काही आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मोठा गोंधळ उडाला. संतप्त झालेल्या आंदोलनकर्त्यांनी दगडफेक सुरू केली. तर पोलिसांनी प्रत्युत्तरात जोरदार लाठीचार्ज केला. त्यामुळे मोठा तणाव निर्माण झाला. यात काही पोलिस आणि आंदोलनकर्तेही जखमी झाले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube