पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून फसवणूक; बारामतीतील तिघांना अटक, 92 लाखांच्या बनावट नोटांसह 1.03 कोटींचा मुद्देमाल जप्त
Ahilyanagar Fake Currency Gang Arrested; पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश.
Ahilyanagar Fake Currency Gang Arrested: अहिल्यानगर: पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून नागरिकांच्या मनात अंधश्रद्धा निर्माण करून त्यांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पुणे जिल्ह्यातील बारामती येथील तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून 500 रुपयांच्या तब्बल 18 हजार 419 बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. या नोटांची दर्शनी किंमत 92 लाख 9 हजार 500 रुपये आहे.
संजय राऊतांच्या पत्रानंतर तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय; 12 अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
पोलीस अधीक्षकांच्या निर्देशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक अहिल्यानगर एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांबाबत माहिती घेत असताना पोलिसांना गणेश शेवाळे याच्याकडे बनावट भारतीय चलनी नोटा असल्याची गोपनीय माहिती मिळाली.
त्यानंतर पोलिसांनी पंचांच्या उपस्थितीत वडगाव रोड येथील त्याच्या राहत्या घराची झडती घेतली. घरातील जिन्याखाली ठेवलेल्या पिशवीत मोठ्या प्रमाणात बनावट नोटा तसेच बनावट नोटा तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कोऱ्या कागदाचे बंडल आढळून आले. या कारवाईत गणेश दिलीप शेवाळे (वय 33), सुमित विकास चंदनशिवे (वय 25) आणि सुरज वसंत कांबळे (वय 27) या तिघांना ताब्यात घेण्यात आले.
अग्निवीरांना नोकरीत 10% आरक्षण ते लॉजिस्टिक्स पार्कला सवलती; मंत्रिमंडळाचे 10 मोठे निर्णय
पोलिसांनी आरोपींकडून 18,419 बनावट नोटा, पाच मोबाईल आणि फोक्सवॅगन कार (एमएच-14-डीएफ-0365) असा एकूण 1 कोटी 3 लाख 74 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांच्या चौकशीत आरोपी गणेश शेवाळे याने या बनावट नोटा काही साथीदारांकडून आणल्याची माहिती दिल्याचे प्रेस नोटमध्ये नमूद आहे. या प्रकरणातील प्रताप धुमाळ, अशोक भिमराज दारकुंडे आणि ‘अम्मु’ हे तिघे सध्या फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
‘पैशांचा पाऊस’ सांगून नागरिकांची फसवणूक
आरोपी नागरिकांना ‘पैशांचा पाऊस पाडतो’ असे सांगून त्यांच्या मनात अंधश्रद्धा निर्माण करत होते. त्यानंतर विश्वास संपादन करून त्यांच्याकडून पैसे घेत फसवणूक करण्यासाठी बनावट नोटांचा वापर केल्याची माहिती तपासात समोर आल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
‘सारथी’ला 122 कोटी, अण्णासाहेब पाटील महामंडळाला 150 कोटींचा निधी मंजूर; विखे पाटलांनी दिली माहिती
या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला तसेच महाराष्ट्र जादूटोणा प्रतिबंध अधिनियमाच्या अन्वये कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. पुढील तपास एमआयडीसी पोलीस ठाण्याकडून सुरू आहे.