Pawar Vs Vikhe : फडणवीसांनी डाव टाकला अन् पवारांचा ‘काटा’ काढला!

Pawar Vs Vikhe : फडणवीसांनी डाव टाकला अन् पवारांचा ‘काटा’ काढला!

अहमदनगर : अहमदनगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत (Bank Election) राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी डाव टाकला आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांचा ‘काटा’ काढला आहे. मुख्यत: फडणीस-विखेंनी एका रात्रीत गोंधळ घातला आणि बँक ताब्यात घेतल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे दुसरीकडे मंगळवारी बाळासाहेब थोरात आणि अजित पवार यांनी बैठक घेऊनही महाविकास आघाडीची चार मते फुटल्याने भाजपचे नेते आणि माजी मंत्री शिवाजी कर्डीले यांची बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.

अहमदनगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत एका रात्रीत नाट्यमय घडामोडी घडल्यानेच शिवाजी कर्डीले यांची बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे मंगळवारी अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी बैठक घेतली. पण त्या बैठकीला डॉ. सुजय विखे पाटील यांना बोलावलेच नाही. त्यामुळे चिडलेल्या डॉ. विखे यांनी थेट राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. त्यात फडणवीस यांनी थेट बँक ताब्यात घेण्याचे आदेश दिल्याने महाविकास आघाडीची चार मते फोडत रात्रीत चित्र पालटले आहे.

Sharad Pawar यांनी पाठिंब्यावरुन नागालँडबाबत स्पष्टच सांगितले…

जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी अजित पवार आणि बाळासाहेब थोरात यांनी सर्व संचालकांची बैठक घेतली होती. त्यात बँकेच्या अध्यक्ष कोणाला करायचे याची चर्चा झाली आणि बुधवारी सकाळी नाव जाहीर केले जाईल, असे अजित पवार यांनी मंगळवारी अहमदनगर दौऱ्यात सांगितलं होतं. या बैठकीला भानुदास मुरकुटे, चंद्रशेखर घुले, राहुल जगताप, आशुतोष काळे, अनुराधा नागवडे आदी उपस्थित होते. या बैठकीत काही नावावर चर्चा देखील झाली होती. बुधवारी सकाळी माजी आमदार चंद्रशेखर घुले यांचे नाव फायनल करण्यात आले होते. ते अध्यक्ष झाल्याचा मेसेज सोशल मीडियावरून व्हायरल देखील झाला होता. मात्र, प्रत्यक्षात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रात्रीत डाव टाकला आणि जिल्हा बँक ताब्यात घेण्यासाठी थेट महाविकास आघाडीची चार मते फोडली. त्यामुळे भाजपचे कर्डीले यांना १० तर महाविकास आघाडीचे घुले यांना ९ मते मिळाली. त्यामुळे भाजपचे शिवाजी कर्डीले हे अध्यक्ष पदी निवडून आले आहेत. महाविकास आघाडीकडे १४ तर भाजपकडे चार मते आणि दोन भाजपला मानणारे असे सहाच मते होती. परंतु, आपलाच विजय होणार या आत्मविश्वासात असलेल्या महाविकास आघाडीला दणका बसला. चार मते फोडत भाजपने विजयश्री खेचून आणली.

विजयानंतर शिवाजी कर्डिले म्हणाले की, महाविकास आघाडीकडे आम्हाला एक वर्षांसाठी अध्यक्षपदाची संधी द्या, अशी विनंती करूनही त्यांनी दाद दिली नाही. त्यामुळं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा फाॅर्म भरला. त्यातच उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे जिल्हा बँक भाजपच्या ताब्यात घ्या, अशा स्पष्ट सूचना दिल्या. विखे कुटुंबीयांची किमया झाली अन् अध्यक्षपदासाठी निवडून आलाे. यापुढे सर्वांच्या सहकार्याने बँकेचे काम करणार आहे.

डाॅ. सुजय विखे-पाटील म्हणाले की, विराेधकांना या निवडणुकीमुळे भाजपमध्ये कुठलीही विसंगती नसल्याचा नक्कीच बाेध झाला असेल. भाजपच्या संचालकांना विश्वासात घेतले असते, तर कदाचित ही निवडणूक झाली नसती. परंतु, यापुढे सर्वांना विश्वासात घेऊनच बँकेचा कारभार केला जाईल. आम्ही सहकारात राजकारण करणार नाही. तर सर्वाना बरोबर घेऊन सहकार वाढवण्यासाठी काम करू.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube