‘ही विजयाची सुरुवात’ म्हणत अक्षय कर्डिले मैदानात; राहुरीत उद्या शक्तीप्रदर्शनासह दाखल करणार उमेदवारी अर्ज

शहरातील प्रमुख मार्गांवरून ही मिरवणूक काढण्यात येणार असून, यामुळे संपूर्ण परिसरात निवडणुकीचे वातावरण रंगणार आहे.

  • Written By: Published:
Untitled Design 47

Akshay Kardile will file his nomination tomorrow : राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्या संपूर्ण तालुक्यात राजकीय वातावरण चांगलेच तापण्याची चिन्हे दिसत आहेत. अक्षय कर्डिले हे सकाळी 10 वाजता राहुरी येथील तहसील कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असून, त्यानंतर पांडुरंग मंगल कार्यालय येथे भव्य शक्तीप्रदर्शनासह जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या शक्तीप्रदर्शनाला रवींद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. त्यांच्यासोबत राज्याचे प्रभावी नेते आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हेही मंचावर उपस्थित राहणार असल्यामुळे या सभेला विशेष राजकीय वजन प्राप्त झाले आहे.

स्थानिक तसेच जिल्हा पातळीवरील अनेक पदाधिकारी, माजी आमदार, तसेच विविध आघाड्यांचे कार्यकर्ते या कार्यक्रमात सहभागी होणार असल्याची माहिती मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच भारतीय जनता पार्टी कडून अक्षय कर्डिले यांना राहुरी मतदारसंघासाठी अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर पक्षात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, उद्याच्या कार्यक्रमातून ताकद दाखवण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचे दिसून येत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या निमित्ताने उद्या राहुरी शहरात मोठ्या प्रमाणावर रॅली, ढोल-ताशांचा गजर, तसेच मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

शहरातील प्रमुख मार्गांवरून ही मिरवणूक काढण्यात येणार असून, यामुळे संपूर्ण परिसरात निवडणुकीचे वातावरण रंगणार आहे. अक्षय कर्डिले यांनी कार्यकर्त्यांना आवाहन करताना सांगितले की, “ही केवळ उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया नाही, तर विजयाच्या दिशेने टाकलेले पहिले ठोस पाऊल आहे.” त्यांनी सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले असून, “राहुरीत परिवर्तन घडवण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे,” असा संदेश त्यांनी दिला आहे.

दरम्यान, विरोधी पक्षांकडूनही या शक्तीप्रदर्शनावर बारकाईने लक्ष ठेवले जात असून, आगामी काळात राहुरी मतदारसंघात प्रचार अधिक रंगतदार होण्याची शक्यता आहे. उद्याचा कार्यक्रम हा केवळ अर्ज भरण्यापुरता मर्यादित न राहता, निवडणुकीच्या रणधुमाळीची अधिकृत सुरुवात ठरणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

follow us