Rahul Narvekar On Sanjay Raut : अलिबागमध्ये जमीन लाटण्याचा आरोपच; संजय राऊतांच्या आरोपावर राहुल नार्वेकर म्हणाले…
Rahul Narvekar On Sanjay Raut : ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर अलिबाग येथे
Rahul Narvekar On Sanjay Raut : ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर अलिबाग येथे आदिवासींच्या जमिनी लाटण्याचा गंभीर आरोप केला आहे. तसेच या प्रकरणात सखोल चौकसी करण्यासाठी संजय राऊत यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देखील लिहिले आहे. या पत्रात त्यांनी राहुल नार्वेकरांवर अनेक गंभीर आरोप केले आहे. तर आता संजय राऊत यांच्या या आरोपांवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. संजय राऊत यांच्या आरोपात काहीही तथ्य नाही असं राहुल नार्वेकर म्हणाले.
संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या आरोपात काहीही तथ्य नाही. ज्या जमिनीवरुन आरोप होत आहेत ती अदिवासी जमीन नसून भोगवटा क्रमांक 1 ची जमीन आहे. अदिवासींनी 2024 पूर्वी केलेल्या सर्व तक्रारींचा निपटारा झाला आहे. 2024 सालापर्यंत झालेल्या तक्रारींमध्ये कुठेही नार्वेकर कुटुंबाचा नावाचा उल्लेख नाही असं माध्यमांशी बोलताना राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) म्हणाले.
2024 पर्यंत जमिनीची मालकी बलदेवसिंह जाला यांच्याकडे होती. नार्वेकर यांच्या पत्नीने ही जमीन बलदेवसिंह जाला यांच्याकडून 2024 नंतर विकत घेतली आहे. संबंधित तक्रारींबाबत जाला यांनी या घरांऐवजी पर्यायी जागेवर आदिवासींना पक्के घरं बांधून दिली आहेत. सोबतच, आदिवासी बांधवांना पैसे व बोअरवेल ही दिलेली आहे. या पुनर्वसनानंतर आदिवासी बांधवांनी कोणतीही तक्रार नसल्याचे प्रतिज्ञापत्र दिले होते असं देखील यावेळी राहुल नार्वेकर म्हणाले.
संजय राऊतांच्या पत्रात नेमकं काय ?
देवेंद्रजी, अत्यंत व्यतीत अंतःकरणाने व आपण नक्की न्याय कराल या अपेक्षेने मी हे पत्र लिहीत आहे. संवैधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीने सार्वजनिक जीवनात वावरताना किमान मर्यादांचे पालन केले पाहिजे हे आपणही मान्य कराल. महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या मनमानी वर्तनाविरोधात अलिबाग तालुक्यातील आदिवासी समाज गेल्या काही काळापासून आंदोलन करीत आहे व पोलीस यंत्रणा त्या आदिवासींवर जबरदस्ती करत त्यांना पळवून लावत आहेत. हे सर्व विधानसभा अध्यक्षांच्या दबावाखाली घडत असेल तर नार्वेकर यांना त्यांच्या पदावरून तत्काळ दूर करणे गरजेचे आहे.
राहुल नार्वेकर व त्यांचे नगरसेवक बंधू मकरंद यांनी गेल्या काही काळापासून अलिबाग तालुक्यात मोठ्या प्रमाणावर जमीन खरेदीचा सपाटा चालवला आहे. या ‘सपाट्या’तून गरीब आदिवासींच्या जमिनीही सुटलेल्या नाहीत. म्हात्रोळी गावातील येथे कातकरी आदिवासी कुटुंबाच्या जमिनीचा बेकायदेशीर कब्जा घेऊन त्यांचे घर तोडून संपूर्ण कुटुंबाला विस्थापित करण्याचा प्रकार महाराष्ट्राच्या प्रतिमेस कलंक लावणारा आहे. हे सर्व प्रकरण असे आहे… अलिबाग तालुका, जिल्हा रायगड येथील म्हात्रोळी गावातील कातकरी आदिवासी वाडीत पिढ्यान्पिढ्या राहणाऱ्या सुमारे 20 आदिवासी कुटुंबांच्या घरांची दिनांक 24 मार्च 2024 रोजी व त्यानंतरच्या दिवसांत बेकायदेशीर पद्धतीने तोडफोड करून त्यांना जबरदस्तीने विस्थापित करण्यात आले. सदर जमीन (गट क्रमांक 148/1 क्षेत्र 15 एकर) फेब्रुवारी 2024 मध्ये महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांच्या पत्नी सौ. सरोजिनी राहुल नार्वेकर यांच्या नावे खरेदी केली.
जमिनीवर आदिवासींची घरे असल्याचे लक्षात आल्यानंतर नार्वेकर यांचे एजंट दशरथ पाटील यांनी मोठ्या जमावासह येऊन कोणतीही पूर्वसूचना न देता जेसीबीच्या सहाय्याने आदिवासींची घरे तोडली. घरातील सामान उद्ध्वस्त करून मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडून टाकण्यात आले. बोअरवेलदेखील उखडून टाकण्यात आली. तेथे आदिवासी रहात असल्याचे पुरावे अशा प्रकारे दाबून टाकले. आदिवासी कातकरी कुटुंबांनी आक्रोश केला तेव्हा वाडीपासून 2-3 किलोमीटर अंतरावरील पर्यायी जागेत राहायला जबरदस्ती करण्यात आली. काही कुटुंबांना थोडे पैसे दिले गेले, तर काहींना काहीही दिले नाही. तुमचे तुम्ही बघा. या जमिनीवर आता आमचा कब्जा आहे असे धमकवण्यात आले. विधानसभा अध्यक्षांची ही कृती गुंड प्रवृत्तीचीच आहे.
महाराष्ट्र शासनाने 4 जानेवारी 2017 रोजी घेतलेल्या निर्णयानुसार ही कुटुंबे त्यांच्या घराखालील जमिनीचे मालक आहेत. ही नोंद अलिबाग तहसीलदाराच्या सर्वेक्षण रेकॉर्डमध्ये आहे. या कुटुंबांकडे 15-20 वर्षांपासून घरपट्टीच्या पावत्या आहेत. यातील योजनेतून घर मिळाले होते, तेही उद्ध्वस्त करण्यात आले. हे अत्यंत निर्घृण आहे. घरात लहान मुले व वृद्ध महिला असताना असे वागणे हे अत्यंत निर्घृण आहे. या प्रकरणात पोलीस व महसूल यंत्रणेची भूमिका ही गुंडशाहिस त साथ देण्याची आहे. आदिवासी कुटुंबांनी वारंवार तक्रार केली असतानाही पोलीस व महसूल अधिकाऱ्यांनी तक्रार दाखल न करता धमकी देऊन त्यांच्याकडून ‘आम्ही हक्क सांगणार नाही’ असे लेखी घेतले. कागदावर काय लिहिले आहे हे न वाचता अंगठे घेण्यात आले. 2025 मध्ये याबाबत राज्य मानवी हक्क आयोगाकडे दाखल केलेला दावादेखील अज्ञानी याचिकाकर्ते सुनावणीला उपस्थित न राहिल्याच्या कारणावरून एकतर्फी निकाली काढण्यात आला. सध्या ही कातकरी कुटुंबे अत्यंत दयनीय स्थितीत आहेत. पर्यायी जागेत पिण्याचे पाणी, वीज, रस्ता अशा मूलभूत सोयी नाहीत. बोअरवेलचे पाणीदेखील दूषित आहे. मालक त्यांना तेथूनही हुसकावून लावत आहेत. मुख्यमंत्री महोदय याला कायद्याचे राज्य म्हणायचे काय?
माझी आपणाकडे विनंती आहे…
शेतकऱ्यांच्या हक्कासाठी एकत्र का येत नाही? राजू शेट्टींचा कारखानदारांना तीव्र आंदोलनाचा इशारा-
1. या प्रकरणी तातडीने स्वतंत्र चौकशी करण्यात यावी.
2. दशरथ पाटील तसेच कृत्यात सहभागी झालेल्या अन्य व्यक्तींवर अत्याचार प्रतिबंधक कायदा व संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात यावा.
3. विस्थापित आदिवासी कुटुंबांना त्यांच्या मूळ जागेवर पुनर्वसन करण्यात यावे किंवा योग्य पर्यायी जागा व भरपाई मिळावी.
4. पोलीस व महसूल यंत्रणेतील अधिकाऱ्यांच्या या प्रकरणातल्या भूमिका तपासाव्यात.