मोठी बातमी, मनोज जरांगेंना आझाद मैदानात आंदोलन करण्यास परवानगी

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करण्यास अटी-शर्थीसह एक दिवसाची परवानगी मिळाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) एका जनहित याचिकेवर सुनावणी करताना मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करु नये असे आदेश 26 ऑगस्ट रोजी दिले होते. मात्र आता मनोज जरांगे पाटील यांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांना विविध अटी – शर्थीसह एका दिवसासाठी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करण्यास परवानगी मिळाली आहे.
सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांना मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करण्यास परवानगी दिली आहे. पोलिसांनी फक्त 5 हजार आंदोलकांसह आंदोलन करण्याची परवानगी दिली आहे. याच बरोबर पोलिसांनी शनिवार, रविवार व शासकीय किंवा सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी आंदोलनासाठी परवानगी देण्यात येणार नसल्याची माहिती देखील दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंदोलनादरम्यान आझाद मैदानात ठाराविक वाहनांना परवानगी देणार आहे. आझाद मैदानात मुख्य आंदोलकासोबत फक्त 5 वाहने आझाद मैदान येथे जातील व इतर सर्व वाहने ही वाडीबंदर येथून पोलिसांनी निर्देशित केलेल्या शिवडी, ए शेड व कॉटनग्रीन परिसरात नियोजित ठिकाणी पार्किंगसाठी जाणार आहे.
आझाद मैदानात आंदोलन करताना आंदोलकांची संख्या पाच हजार ही पाळणे बंधनकारक असणार आहे. याच बरोबर आझाद मैदानाचे ७ हजार स्कवेअर एवढेच मीटर क्षेत्र आंदोलनासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. तसेच आंदोलकांना परवानगी घेतल्याशिवाय ध्वनीक्षेपक, सार्वजनिक प्रचार यंत्रणा किंवा गोंगाट करणारी उपकरणे यांचा वापर करता येणार नाही.
मुंबईत काही तरी मोठं घडणार; जरांगे मुंबईकडे निघताच उपमुख्यमंत्री शिंदेंचा दरे गावाचा दौरा रद्द
एका जनहित याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानात आंदोलन करण्याच्या आपल्या भूमिकेवर ठाम होते. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर मुंबई पोलिस काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते.