बळीराजावर आस्मानी संकट; राज्यात तीन दिवस अवकाळीचा इशारा
मुंबई : आगामी तीन दिवस महाराष्ट्रात (Maharashtra)अवकाळी पाऊस होण्याची शक्यता वर्तवली जातेय. भारतीय हवामान विभागानं (IMD) याबाद्दलची माहिती दिलीय. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात 5 ते 8 मार्चदरम्यान काही ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, 7 मार्चला मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता व्यक्त केलीय. शिवाय आज देखील नाशिक, नंदुरबार, धुळे आणि जळगावात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवलीय.
उद्धव ठाकरेंची आजची सभा रडायची, टोमणे मारायची, शितल म्हात्रेंनी ठाकरेंना डिवचलं
औरंगाबाद, जालना आणि अहमदनगर जिल्ह्यात काही ठिकाणी आज पावसाचा अंदाज वर्तवलाय. विदर्भात अकोला, बुलढाणा आणि अमरावती जिल्ह्यात देखील विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवलीय.
आज राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज नाशिकसह धुळे, बुलढाणा आणि पालघर जिल्ह्यात देखील अवकाळी पाऊस झाला आहे. धुळे जिल्ह्यातील साक्री, शिंदखेडा, शिरपूर या तालुक्यांसह धुळे तालुक्यात मध्यरात्रीनंतर अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावलीय.
नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यात आणि परिसरात मध्यरात्री विजेच्या कडकडाटासह हलक्या स्वरुपाचा पाऊस झालाय. गेल्या दोन दिवसांपासून तापमानात बदल झाला असून ढगाळ वातावरण होतंय. ढगाळ वातावरणामुळं मका, पपई, केळी आणि उशिरा लावलेल्या गहू, हरभरा या पिकांवर काही प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता वर्तवलीय.
पालघर जिल्ह्याच्या पूर्व भागातही अवकाळी पावसानं हजेरी लावलीय. यामुळं आंबा पिकासह रब्बी पिकांचंही मोठं नुकसान झालंय. पालघर जिल्ह्याच्या पूर्वेच्या विक्रमगड, वाड्यासह काही भागात अचानक विजेच्या गडगडाटासह अवकाळी पावसानं आज हजेरी लावलीय.