काँग्रेसचे दलित कार्ड : विधान परिषदेला पराभूत झालेल्या चंद्रकांत हांडोरे यांना राज्यसभेची उमेदवारी

काँग्रेसचे दलित कार्ड : विधान परिषदेला पराभूत झालेल्या चंद्रकांत हांडोरे यांना राज्यसभेची उमेदवारी

मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे (Congress) कार्यकारी अध्यक्ष चंद्रकांत हांडोरे (Chandrakant Handore) यांना राज्यसभेची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. हांडोरे यांना महाराष्ट्रातील काँग्रेसचा दलित चेहरा म्हणून ओळखले जाते. जून 2022 मधील विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेस आमदारांच्या गोंधळामुळे पहिल्या पसंतीचे उमेदवार असूनही हांडोरेंचा पराभव झाला होता. त्यानंतर आता त्यांना राज्यसभेवर संधी देत काँग्रेसने लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर आपली चूक सुधारली असल्याचे बोलले जात आहे. (Chandrakant Handore has been announced as a Rajya Sabha candidate by Congress.)

केंद्रीय निवडणूक आयोगाने 15 राज्यांमधील 56 जागांसाठी राज्यसभा निवडणुकीची घोषणा केली आहे. या निवडणुकीसाठी 15 फेब्रुवारीपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आहे. अशात काँग्रेसने चार राज्यांमधील चार उमेदवारांची घोषणा केली आहे. यात राजस्थानमधून सोनिया गांधी, बिहारमधून डॉ. अखिलेश प्रसाद सिंग, हिमाचल प्रदेशमधून अभिषेक मनु सिंघवी आणि महाराष्ट्रातून चंद्रकांत हांडोरे यांना तिकीट जाहीर करण्यात आले आहे. यातील सोनिया गांधी आजच उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती आहे.

राज्यसभा निवडणूक : अशोक चव्हाणांपाठोपाठ मेधा कुलकर्णींची कागदपत्रांसाठी धावाधाव

कोण आहेत चंद्रकांत हांडोरे?

काँग्रेसचा मुख्य जनाधार हा दलित, आदिवासी, मुस्लिम समाज राहिला आहे. हांडोरे हेही मूळचे आंबेडकरी चळवळीतील लढवय्या कार्यकर्ते म्हणून ओखळले जातात. दलित पॅंथर, भारिप-बहुजन महासंघ, रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) ते काँग्रेस असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे. 1985 मध्ये मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून येऊन, त्यांनी राजकीय प्रवासाला सुरुवात केली होती. पुढे 1992-93 मध्ये आपले खास राजकीय कौशल्य वापरून त्यांनी मुंबईचे महापौरपदही मिळविले. कालांतराने ते काँग्रेसमध्ये दाखल झाले.

केजरीवालांचा माइंड गेम! दिल्लीत प्रस्ताव, गुजरात-गोव्यात थेट उमेदवारांची घोषणा

2004 मध्ये ते काँग्रेसच्या तिकीटावर चेंबूर मतदारसंघातून निवडून आले आणि विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री झाले. सामाजिक न्याय मंत्री म्हणून त्यांची वर्णी लागली. 2009 मध्ये ते दुसऱ्यांदा विधानसभेवर निवडून आले. तर 2014 आणि 2019 साली त्यांचा शिवसेनेच्या प्रकाश फातर्पेकर यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. त्यानंतर 2022 मध्ये विधान परिषद निवडणुकीत अनेक दिग्गजांना डावलून त्यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र काँग्रेस आमदारांच्या क्रॉस व्होटिंगमुळे पहिल्या पसंतीचे उमेदवार असूनही हांडोरे यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube