अहिल्यानगर डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग हब बनणार; 5 हजार कोटींची गुंतवणूक आणि 4 हजार रोजगारांची फडणवीसांनी केली घोषणा
मुख्यमंत्री फडणवीसांनी मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारत याअंतर्गत भारताच्या संरक्षण क्षेत्रातील झपाट्याने होत असलेल्या प्रगतीचा उल्लेख केला.
CM Devendra Fadnavis’ big announcement in Ahilyanagar : शिर्डीत आज देशाच्या संरक्षण क्षेत्रासाठी ऐतिहासिक ठरणार क्षण अनुभवायला मिळाला. अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या निबे ग्रुपच्या अत्याधुनिक संरक्षण उत्पादन प्रकल्पाचे उदघाटन केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते पार पडले. या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
अहिल्यानगर जिल्ह्यात प्रथमच उभारण्यात आलेल्या या महत्वाकांक्षी डिफेन्स प्रकल्पामध्ये वर्षाला तब्बल पाच लाख तोफगोळे तयार करण्याची क्षमता असणार आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी प्रकल्पाची पाहणी करत डिफेन्स क्लस्टरचे उदघाटन केले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणातून मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत या संकल्पनांवर भर देत भारताच्या संरक्षण क्षेत्रातील झपाट्याने होत असलेल्या प्रगतीचा उल्लेख केला.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. आजचा दिवस देशासाठी ऐतिहासिक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारतचा संदेश संरक्षण क्षेत्रात प्रभावीपणे राबवण्याचे काम संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केले आहे. पूर्वी इतर देशांवर अवलंबून असलेला भारत आता स्वतःची शास्त्रनिर्मिती करत आहे. ड्रोन, मिसाईल्स आणि आधुनिक शस्त्रास्त्र निर्मितीत देश मोठी झेप घेत आहे.
आई-वडील दोघे IAS तर मुलांना आरक्षण कशासाठी? सुप्रीम कोर्टाच्या प्रश्नाने OBC क्रीमी लेयर वाद पुन्हा ऐरणीवर
याचबरोबर त्यांनी भारतीय सैन्याच्या सामर्थ्याचा देखील उल्लेख केला. पाकिस्तानकडून येणारे ड्रोन आणि मिसाईल्स आपल्या सैन्याने हवेतच नष्ट केले. भारताने कधीही कुणावर आक्रमण केले नाही, मात्र जे आक्रमणकारी आले त्यांना परतवून लावण्याचं काम भारताने नेहमीच केले, असे फडणवीस यांनी ठामपणे सांगितले.
अहिल्यानगरला आता डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणून विकसित करण्यात येणार असल्याची घोषणा देखील त्यांनी केली. या प्रकल्पामुळे सुमारे पाच हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून चार हजारांहून अधिक रोजगारनिर्मिती होणार असल्याचे त्यांनी सांगितले. शिर्डीच्या भूमीचा उल्लेख करताना मुख्यमंत्री म्हणाले, साईबाबांनी जगाला शांतीचा संदेश दिला. मात्र ज्याच्याकडे शक्ती असते, तोच खरी शांती प्रस्थापित करू शकतो. संरक्षण आणि विकास यांचा समतोल साधणारा हा प्रकल्प महाराष्ट्राच्या औद्योगिक आणि सामरिक क्षमतेसाठी महत्वाचा टप्पा मानला जात आहे.