मोठी बातमी! राज्यात लवकरच स्वतंत्र विज्ञान तंत्रज्ञान मंत्रालय; CM फडणवीस यांची घोषणा

Devendra Fadnavis : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (Devendra Fadnavis) नुकतीच एक मोठी घोषणा केली आहे. राज्यात आगामी काळात स्वतंत्र विज्ञान-तंत्रज्ञान मंत्रालय सुरू करण्यात येईल. मागील काही वर्षांपासून स्वतंत्र मंत्रालयाची मागणी केली जात होती. या मागणीवर राज्य सरकारने विचार केला असून आता लवकरच विज्ञान तंत्रज्ञान मंत्रालय मिळणार आहे, अशी घोषणा राज्याेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत फडणवीस यांनी ही माहिती दिली. राज्य सरकारमध्ये जर हे नवीन मंत्रालय सुरू झाले तर विज्ञान तंत्रज्ञानाच्या क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे. तसेच या माध्यमातून रोजगाराच्या संधीही उपलब्ध होतील असे सांगण्यात येत आहे.
राज्यात सध्या विज्ञान तंत्रज्ञाना संदर्भात उपक्रम निश्चित करण्याचे काम राजीव गांधी विज्ञान तंत्रज्ञान आयोगामार्फत केले जाते. परंतु, आता राज्यात विज्ञान तंत्रज्ञानाचे स्वतंत्र खातेच असावे याची गरज आम्हाला जाणवू लागली आहे. यासंदर्भात आमची चर्चाही झाली आहे. या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि संबंधित विभागांचे मुख्य सचिव आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
उद्धव ठाकरेंबरोबर भाजप पुन्हा युती करणार? फडणवीसांच्या उत्तराने चर्चांना कायमचा फुलस्टॉप!
तंत्रज्ञान खाते कसे असले पाहिजे, त्यासाठी किती मनुष्यबळाची आवश्यकता राहील, खात्यामार्फत कोणती कामे केली जातील याचा मसुदा तयार करण्याच्या सूचना या बैठकीत देण्यात आल्या आहेत. यानुसार पुढील टप्प्यात खात्याचा मसुदा तयार होईल. यानंतर खाते सुरू करण्यासंदर्भात कार्यवाही होईल. म्हणजेच राज्यात लवकरच विज्ञान तंत्रज्ञान खाते सुरू होईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात दिली.
तसं पाहिलं तर मागील वीस वर्षांपासून राजीव गांधी विज्ञान तंत्रज्ञान आयोग कार्यरत आहे. या आयोगाच्या माध्यमातून संशोधन संस्था, विद्यापीठे आणि खासगी संस्थांच्या विविध संशोधनासाठी आर्थिक सहकार्य केले जाते. पण यासाठी निधीची तरतूद अत्यल्प असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे राज्यात विज्ञान तंत्रज्ञानाचा विकास जोमाने व्हायचा असेल तर स्वतंत्र मंत्रालय असावे अशी मागणी विज्ञान क्षेत्रातून सातत्याने केली जात होती. आता राज्य सरकारलाही या गोष्टीचे महत्व समजले आहे. त्यामुळे मंत्रालय सुरू करण्यासाठी राज्य सरकारने वेगाने हालचाली सुरू केल्या आहेत.
याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जबाबदार; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर आदित्य ठाकरेंचा थेट वार