नागपूर काँग्रेसमध्ये अंतर्गत घमासान! स्थानिक स्तरावर आमचा छळ, नितीन राऊत संतप्त

आयुक्तांनी गेल्या आठवड्यात कोटा निश्चित केला होता आणि त्यानुसार अर्ज भरायचे होते. परंतु, आमच्यासोबत धोका.

News Photo   2026 04 16T182136.566

नागपूर महानगरपालिकेतील स्वीकृत (Nagpur) नगरसेवकांच्या निवडीवरून काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा अंतर्गत वाद उफाळून आला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार डॉ. नितीन राऊत यांनी या प्रक्रियेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली असून, त्यांच्या समर्थकाला संधी न दिल्याने पक्षात असंतोष निर्माण झाला आहे. यामुळे राऊत राजीनामा देणार का, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

नागपूर महानगरपालिकेत स्वीकृत सदस्य निवडीसाठी पक्षांतर्गत चर्चा सुरू होती. यामध्ये एक सदस्य राऊत गटाचा आणि एक शहराध्यक्ष विकास ठाकरे गटाचा असावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्षात दोन्ही उमेदवार शहराध्यक्षांच्या गटातूनच देण्यात आल्याने राऊत यांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान, यावर प्रतिक्रिया देताना डॉ. नितीन राऊत म्हणाले, नागपूर मनपा आयुक्तांनी गेल्या आठवड्यात कोटा निश्चित केला होता आणि त्यानुसार अर्ज भरायचे होते. मात्र, काल सकाळपर्यंत आम्हाला याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती.

महिला आरक्षणात मुस्लिम महिलांचा समावेश नसल्यास पाठिंबा नाही; अखिलेश यादव यांनी भाजपला फटकारले

या प्रकरणावर मी प्रदेशाध्यक्षांना स्पष्टपणे सांगितलं होतं की, एक आमचा आणि एक त्यांचा सदस्य द्यायला हवा. आमचा उमेदवार अर्ज भरायला गेला असता त्याला दाद देण्यात आली नाही. शेवटच्या क्षणी, अर्ज भरण्याची वेळ संपण्याआधीच काँग्रेसच्या दोन्ही उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात आले. ही गोष्ट माझ्यासाठी नवीन नाही. यापूर्वीही अशा प्रकारे आमच्या गटाला डावलण्यात आलं आहे. त्यांनी पक्षांतर्गत अन्यायाचा आरोप करताना म्हटलं की, दलित समाजातील कार्यकर्त्यांकडं वारंवार दुर्लक्ष केलं जात आहे. एबी फॉर्म गायब करण्यासारख्या घटना घडत आहेत. हा फक्त माझा नाही, तर हा प्रदेशाध्यक्षांचाही अपमान आहे. स्थानिक स्तरावर हा छळ सुरू आहे, असंही राऊत म्हणाले.

राजीनाम्याच्या चर्चांबाबत विचारलं असता राऊत यांनी स्पष्ट भूमिका घेतली नाही. मात्र, त्यांनी इशाराही दिला. आम्हाला वेस्ट पेपरसारखे वापरू देणार नाही. आम्ही संघर्ष करणारे लोक आहोत आणि पुढेही लढत राहू, असं ते म्हणाले. उत्तर नागपूरला आजपर्यंत योग्य प्रतिनिधित्व मिळालं नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. २० जणांनी अर्ज भरले आहेत, मात्र उत्तर नागपूर आणि दलित समाजाला संधी देण्याबाबत गंभीर विचार व्हायला हवा, असंही ते म्हणाले.

दरम्यान, नारी शक्ती अधिनियम आणि महिला आरक्षण विधेयकाबाबत बोलताना राऊत यांनी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली. महिला आरक्षणासाठी काँग्रेसने सातत्याने प्रयत्न केले आहेत. संसदेत महिलांना योग्य प्रतिनिधित्व मिळायला हवे. तसेच एससी, एसटी आणि ओबीसी वर्गासाठीही आरक्षणाची तरतूद असावी, असं त्यांनी सांगितलं. नागपूर काँग्रेसमधील या घडामोडींमुळे पक्षातील अंतर्गत मतभेद पुन्हा समोर आले असून, आगामी काळात पक्षश्रेष्ठी यावर काय निर्णय घेतात, याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

follow us