काँग्रेसला मोठा धक्का! मराठवाड्यातील आमदाराचा राजीनामा; लवकरच भाजपात प्रवेश?
Maharashtra Elections : राज्यात विधानसभा निवडणुकीआधी मोठ्या राजकीय घडामोडी (Maharashtra Elections) घडत आहेत. लोकसभा निवडणुकीत अभेद्य राहिलेल्या महाविकास आघाडीला तडे जाऊ लागले आहेत. काँग्रेसलाच मोठा (Congress Party) धक्का बसला आहे. काँग्रेसचे देगलूर मतदारसंघाचे आमदार जितेश अंतापूरकर यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यांनी आपल्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. आता अंतापूरकर लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील असे सांगितले जात आहे. जितेश अंतापूरकर कधीही राजीनामा देऊन महायुतीत जातील अशा चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होत्या. अखेर या चर्चा खऱ्या असल्याचे सिद्ध झाले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस जम्मू काश्मीरसाठी तयार! स्टार प्रचारकांची यादी जाहीर, ‘या’ नावांचा समावेश
विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसचे आमदार फुटल्याचा आरोप झाला होता. यावेळी आमदार हिरामण खोसकर यांचं नाव पुढं आलं होतं. याच हिरामण खोसकर यांच्याबरोबर आमदार अंतापुरकरांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. या भेटीबाबत अंतापूरकर यांनी मात्र नकार दिला होता. काँग्रेस सोडणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते. शेतकऱ्यांच्या समस्या घेऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती असे अंतापूरकर म्हणाले होते. आता मात्र त्यांनी काँग्रेस सोडल्याचीच बातमी येऊन धडकली आहे.
अंतापूरकर आजच भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत (Elections 2024) तिकीट मिळणार नाही याची जाणीव त्यांना झाली होती. विधानपरिषद निवडणुकीत (MLC Elections 2024) काँग्रेसची मतं फुटली होती त्यात जितेश अंतापूरकरांचाही समावेश होता असा संशय काँग्रेसला होता. या आमदारांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा काँग्रेसने दिला होता. पक्षाच्या वरिष्ठांना अहवालही पाठवला गेला होता. मात्र या आमदारांवर कारवाई झालीच नाही. उलट या आमदारांना गाफील ठेऊन विधानसभेचं तिकीट देऊ नये अशा सूचना हायकमांडने दिल्याची चर्चा होती. काँग्रेसच्या या अंतर्गत राजकारणाचा अंदाज आमदारांनाही आला होता. त्यामुळे या आमदारांनी आता वेगळ्या वाटा शोधण्यास सुरुवात केली आहे.
सरपंच ते खासदार! काँग्रेसचं निष्ठावंत नेतृत्व काळाच्या पडद्याआड, वसंतराव चव्हाण यांचा राजकीय प्रवास