डाबरच्या खाद्य उत्पादनांवरील ‘100%’ दावे वादात; एफएसएसएआयचे विक्रीसंदर्भात महत्वाचे निर्देश

एफएसएसएआयने स्पष्ट केले की, विद्यमान अन्न सुरक्षा नियमांमध्ये ‘100%’ अशा स्वरूपाचे दावे करण्यास परवानगी नाही.

News Photo   2026 08 04T171114.953

खाद्यपदार्थांच्या पॅकेजिंगवर ‘100% शुद्ध’, ‘100% नैसर्गिक’, ‘100% सेंद्रिय’ अशा दाव्यांबाबत भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने (एफएसएसएआय) कठोर भूमिका घेतली असून, डाबर (Dabar) इंडियाच्या काही खाद्य उत्पादनांवरील अशा दाव्यांवर आक्षेप नोंदवला आहे. संबंधित उत्पादनांची विक्री थांबवण्याचे निर्देश देत १५ दिवसांत केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करण्याचे आदेश कंपनीला देण्यात आले आहेत.

एफएसएसएआयच्या आदेशानुसार, मध, गाईचे तूप, मोहरीचे तेल, तिळाचे तेल, व्हर्जिन नारळ तेल, ॲपल सायडर व्हिनेगर, नारळाचे पाणी आणि नारळाचे दूध या उत्पादनांवरील ‘100% शुद्ध’, ‘100% नैसर्गिक’, ‘100% शुद्धतेची हमी’, ‘100% सेंद्रिय’ आणि ‘100% कोवळ्या नारळाचे पाणी’ अशा दाव्यांवर आक्षेप घेण्यात आला आहे. नियामकाच्या मते, हे दावे अस्पष्ट असून त्यांची वैज्ञानिक पडताळणी शक्य नसल्यामुळे ग्राहकांची दिशाभूल होण्याची शक्यता निर्माण होते.

शंभर टक्के नियम पालन तरी परवाना निलंबित; एफडीएला दंड होणार?, उच्च न्यायालयाची तीव्र नाराजी

एफएसएसएआयने स्पष्ट केले की, विद्यमान अन्न सुरक्षा नियमांमध्ये ‘100%’ अशा स्वरूपाचे दावे करण्यास परवानगी नाही. एखादे उत्पादन भेसळमुक्त आहे की नाही, याची प्रयोगशाळेत तपासणी करता येते; मात्र ‘100% शुद्ध’ असल्याचा दावा वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध करणे शक्य नसल्याने अशा दाव्यांना मान्यता देता येत नाही. तसेच अशा दाव्यांमुळे इतर ब्रँडच्या उत्पादनांपेक्षा संबंधित उत्पादन अधिक दर्जेदार असल्याचा चुकीचा समज ग्राहकांमध्ये निर्माण होऊ शकतो.

नियामकाने डाबरच्या काही उत्पादनांवरील ‘ऑरगॅनिक इंडिया’ लोगोवरही आक्षेप घेतला आहे. वैध सेंद्रिय प्रमाणपत्राशिवाय डाबर हिमालयन ऑरगॅनिक ॲपल सायडर व्हिनेगर आणि डाबर ऑरगॅनिक हनी या उत्पादनांवर हा लोगो वापरण्यात आल्याचे एफएसएसएआयच्या निदर्शनास आले. त्यामुळे हा वाद केवळ जाहिरातीतील दाव्यांपुरता मर्यादित नसून सेंद्रिय प्रमाणपत्राच्या वापराशीही संबंधित असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

एफएसएसएआयने यापूर्वीही कंपनीला अशा दाव्यांबाबत सुधारणा करण्यासाठी नोटीस बजावली होती. मात्र अपेक्षित बदल न झाल्याने ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, आदेशानंतरही काही ई-कॉमर्स संकेतस्थळांवर जुने लेबल असलेली उत्पादने उपलब्ध असल्याचे दिसून आले असून, पॅकेजिंग आणि ऑनलाइन माहिती अद्ययावत होण्यासाठी काही कालावधी लागू शकतो.

यापूर्वी जून २०२४ मध्येही एफएसएसएआयने कॉन्सन्ट्रेटपासून तयार होणाऱ्या फळांच्या रसावर ‘100% फळांचा रस’ असा दावा न करण्याचे निर्देश सर्व अन्न उत्पादक कंपन्यांना दिले होते. त्यामुळे ग्राहकांनी केवळ आकर्षक दाव्यांवर विश्वास न ठेवता उत्पादनावरील घटकांची यादी, एफएसएसएआय परवाना क्रमांक आणि सेंद्रिय उत्पादन असल्यास वैध प्रमाणपत्राची माहिती तपासूनच खरेदी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

follow us