‘वंदे मातरम’वर आक्षेप घेणाऱ्यांना मोहम्मद शमीचं सडेतोड उत्तर; म्हणाला, ‘मी कोणालाही घाबरत नाही’
mohammed shami vande mataram statement team india comeback शमी म्हणाला, ‘वंदे मातरम’ किंवा ‘भारत माता की जय’ म्हणण्यात गैर काहीच नाही.
Mohammed Shami Vande Mataram Statement: भारतीय क्रिकेट संघातून (Indian Cricket Team) सध्या बाहेर असलेला वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी त्याच्या क्रिकेटमधील पुनरागमनापेक्षा ‘वंदे मातरम’ (Vande Mataram) आणि देशभक्तीच्या घोषणांवर त्याने केलेल्या वक्तव्याची चर्चा होत आहे. ‘वंदे मातरम’ म्हणण्यावर किंवा ‘भारत माता की जय’चा नारा देण्यावर आक्षेप घेणाऱ्यांना शमीने थेट प्रत्युत्तर दिले आहे. टाइम्स नाऊच्या हिंदी वाहिनीवरील एका मुलाखतीत शमीला ‘वंदे मातरम’च्या मुद्द्यावर प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा देशाने किंवा सरकारने एखादा नियम केला, तर त्याचे पालन करण्यात गैर काय, असा सवाल त्याने उपस्थित केला. देशभक्तीच्या घोषणांचा धर्म किंवा जातीशी संबंध जोडणे योग्य नसल्याचेही त्याने स्पष्ट केले.
‘कोणाला अडचण आहे, अडचण का असावी?’
शमी म्हणाला की, आपल्या देशाबद्दल अभिमान व्यक्त करण्यासाठी ‘वंदे मातरम’ किंवा ‘भारत माता की जय’ म्हणण्यात गैर काहीच नाही. “मी माझ्या देशाचे नाव घेत आहे, त्यामुळे माझं काय नुकसान होणार आहे?” असे तो म्हणाला.
इराणविरोधात अमेरिकेची नवी रणनीती; हवाई हल्ल्यांनी उद्दिष्ट साध्य न झाल्याने पर्यायी मार्गांचा शोध
देशाचा नागरिक म्हणून सरकारने लागू केलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचेही शमीने नमूद केले. या मुद्द्याला धर्म आणि जात यांच्याशी जोडण्याची गरज नसल्याचे त्याने स्पष्ट केले. शमीने पुढे सांगितले की, अशा प्रकारच्या प्रश्नांचा त्याने यापूर्वीही सामना केला आहे. कॅमेऱ्यासमोरही त्याला याबाबत प्रश्न विचारण्यात आले आहेत. मात्र, कोणाच्याही दबावाला आपण घाबरत नसल्याचे त्याने ठामपणे सांगितले.
टीम इंडियात पुनरागमनासाठी शमीची तयारी
दरम्यान, मोहम्मद शमीच्या भारतीय संघातील पुनरागमनाबाबतही प्रश्नचिन्ह कायम आहे. दुखापतीमुळे बराच काळ क्रिकेटपासून दूर राहिल्यानंतर त्याने गेल्या वर्षी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय संघात पुनरागमन केले होते. मात्र, त्यानंतर पुन्हा दुखापतीच्या समस्येमुळे तो संघाबाहेर गेला. सध्या शमी भारताच्या टी-20, वनडे आणि कसोटी संघाचा भाग नाही. त्याच्या पुनरागमनाची मागणी चाहत्यांकडून होत असली, तरी निवड समितीच्या भूमिकेबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत.
IND vs SL : श्रीलंका दौऱ्यासाठी मोठा निर्णय ; भारतीय संघात 4 नवीन खेळाडूंचा समावेश
मात्र, शमीने अद्याप हार मानलेली नाही. देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलच्या माध्यमातून स्वतःला सिद्ध करण्याचा त्याचा प्रयत्न सुरू आहे. आता 23 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या दुलीप ट्रॉफीमध्ये तो पूर्व विभागाकडून खेळणार असल्याने त्याच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शमीच्या कामगिरीवरच त्याच्या टीम इंडियातील पुनरागमनाच्या आशा पुन्हा मजबूत होणार की त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला पूर्णविराम मिळणार, याचे उत्तर आगामी काळात मिळेल.