मस्ती असलेल्या लोकांना खड्यासारखं बाजूला काढलं जातं; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राजन पाटलांना इशारा
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माजी आमदार राजन पाटील यांच्यावर विखारी टीका. दमदाटी आणि दहशतीचं राजकारण करत असल्याचा केला आरोप.
Dcm ajit pawar speaks on rajan patil : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी आमदार राजन पाटील यांच्यावर विखारी टीका केली आहे. सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील अनगर नगरपंचायत मागील बऱ्याच दिवसांपासून राज्यभरात चर्चेचा विषय ठरतीये. त्यामागील कारणही तसंच आहे. अनगर नगरपंचायतीत नगराध्यक्ष पदाची निवडणूक ही बिनविरोध झाली. आणि त्यानंतर राजन पाटील यांचे पुत्र बाळराजे पाटील यांनी जल्लोष करताना थेट उपमुख्यमंत्री अजित पवार (Dcm Ajit Pawar) यांना आव्हान देत “कोणाचाही नाद करा पण अनगरकरांचा नाद करू नका” असं म्हटलं होतं. विशेष म्हणजे या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून (NCP) उज्वला थिटे यांनी देखील नगराध्यक्षपदासाठी अर्ज भरला होता. मात्र काही तांत्रिक कारणास्तव त्यांचा अर्ज बाद करण्यात आला होता. याच पार्श्वभूमीवर सोलापूरच्या वडाळा येथील एका कार्यक्रमात बोलत असताना अजित पवार यांनी राजन पाटील (Rajan Patil) यांच्यावर दमदाटी आणि दहशतीचं राजकारण करत असल्याचा आरोप केला. प्रत्येकाचा काळ असतो. दरवेळी दमदाटी करून चालत नाही. हा फुगा कधी ना कधी फुटत असतो. मस्ती असलेल्या लोकांना खड्यासारखं बाजूला काढलं जातं. अशा शब्दांत त्यांनी राजन पाटील यांना खडे बोल सुनावलेत.
नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोपरगावात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा
अजित पवार यांनी राजन पाटील यांच्यावर ज्या कार्यक्रमात टीका केली, तिथे उज्वला थिटे या देखील उपस्थित होत्या. यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की उज्वला थिटे या देखील इथे बसलेल्या आहेत. त्यांच्या बाबतीत या निवडणुकीत काय झालं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आपल्याकडं लोकशाही आहे. संविधान आणि कायदा सगळ्यांना सारखाच आहे. यावेळी त्यांनी तेथील स्थानिक नेत्यांना आणि चांगल्या विचारांच्या लोकांना संधी देण्याचं आवाहन देखील केलं. त्याचप्रमाणे त्यांनी लाडक्या बहिणींचा देखील यावेळी उल्लेख केला. उज्वला थिटे या येथेच आहेत. भाऊ म्हणून आम्ही आमच्या बहिणीचं रक्षण करण्याचं काम केलं. तसेच “नव्या लोकांना संधी द्या आणि जुन्या लोकांचा अनुभव घ्या” असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. महिलांना शरद पवार (Sharad Pawar) यांनी आरक्षणाची सुरूवात केली होती. या घटनेला देखील यावेळी त्यांनी उजाळा दिला.
