भीमाशंकर नक्की कुणाचं? राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये वाद पेटला? कारण काय?
भीमाशंकर विकास आराखड्यासाठी एकूण 288 कोटी 17 लाख रुपये मंजुर करण्यात आलेत.
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भीमाशंकरच्या (Bhima Shankar) विकासासाठी तब्बल 288 कोटी 17 लाख रुपयांच्या विकास आऱाखड्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मंजुरी दिली आहे. मात्र, याच विकास आराखड्यासाठीच्या बैठकीनंतर भीमाशंकर नेमकं खेडचं की आंबेगावचं असा राजकीय संघर्ष उफाळून आलाय आणि त्याला कारण ठरलंय खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी घेतलेली भूमिका. भीमाशंकर विकास आराखड्यात आंबेगावचा उल्लेख जोडण्यास खेडचं आमदार बाबाजी काळे यांनी संमती दिल्याचा आरोप होतोय.
दिलीप वळसे पाटलांच्या विनंतीला मान देऊन बाबाजी काळेंनी मुख्यमंत्र्यांपुढे आंबेगावचा उल्लेख जोडण्याचे मान्य केलं. मात्र, भीमाशंकर मंदिर खेड तालुक्यातच असल्याची भूमिका घेत माजी आमदार दिलीप मोहिते-पाटील आक्रमक झालेत..आता याच मुद्द्यावरून राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्येच जुंपलीय. भीमाशंकर परिसरातील गावांना सोय़ीसुविधा आंबेगाव तालुक्यातून पुरवल्या जात असल्यानं भीमाशंकरच्य़ा पुढे आंबेगाव तालुका असा उल्लेख जोडण्याची मागणी आहे.परंतु भीमाशंकर मंदिर हे खेड तालुक्यात येतं.
काय म्हणाले दिलीप वळसे पाटील?
कोण बोलते यालाही किंमत असते, ऐऱ्या-गैऱ्याला मी महत्त्व देत नाही. क्षमता नसलेल्या लोकांनी रडगाणे सुरू ठेवले आहे. मी आठ वेळा आमदार झालो. त्यांनी स्वतःला तपासून पाहावे. मी विकासकामात राजकारण करीत नाही. चासकमान धरणाच्या परिसरातील कळमोडी प्रकल्प रखडलेला आहे. आमदार बाबाजी काळे आणि आपण त्यावर काम करत आहोत.
रद्द झालेल्या पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पाबाबत आपण काही बोलू शकत नाही, याबाबत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना माहिती विचारा, असे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर वळसे पाटील यांनी स्पष्ट केले, ते म्हणाले, मंत्री, आमदार असलो तरी खेड तालुक्यातील राजकीय, सामाजिक वर्तुळात कोणत्याही प्रकारचे अधिकार गाजवले नाहीत. भीमाशंकर देवस्थानच्या विकासावरून वाद निर्माण होत असतील तर मंदिर आणि विकास आराखड्याला खेडचेच नाव राहू द्या.
काय म्हणाले दिलीप मोहिते पाटील?
भीमाशंकर देवस्थानमुळे खेड तालुक्याची ओळख आहे. या देवस्थानच्या नावाखाली खेड-आंबेगाव असं लिहियचं, असा निर्णय खेड आणि आंबेगावच्या आमदारांनी घेतला आहे. तालुक्यातील अनेकांनी त्यास विरोध दर्शविला असून माझाही तीव्र विरोध आहे. त्याची कल्पना देण्यासाठी आज बैठक घेण्यात आली आहे.
भीमाशंकर देवस्थान हे खेड तालुक्यात अनादी काळापासून आहे. घाटरस्ता असल्यामुळे त्या ठिकाणी रस्ता करता आला नाही, तसेच वन विभागात शेकरू असल्यामुळे त्या जंगलात विकास कामांना प्रतिबंध करण्यात आला होता. दिलीप वळसे पाटील आमदार झाल्यानंतर त्यांनी तो रस्ता भीमाशंकरपर्यंत नेला, त्यानंतर सर्व कामं त्यांनी आंबेगाव तालुक्यात करायचं ठरवलं. पूर्वीच्या काळात असाच वाद उद्भवल्यावर वळसे पाटील आणि नारायणराव पवार यांच्यात शाब्दीक चकमकही झाली होती, त्यामुळे भीमाशंकर देवस्थान खेड तालुक्यातच राहिलं पाहिजे, असे मोहिते म्हणाले.
मी २००४ मध्ये आमदार झाल्यानंतर दिलीप वळसे पाटील यांना पुण्यात डीपीडीसीच्या बैठकीला यायचं नव्हतं आणि त्यामुळे त्यांनी ती आंबेगावमध्ये लावली. त्यानंतर ते सुरेश कौदरे यांच्या माध्यमातून देवस्थानचे अध्यक्ष झाले, पुढे ते १० वर्षे अध्यक्ष राहिले. त्या काळात मला त्यांनी उपाध्यक्षही होऊ दिलं नाही. भीमाशंकर देवस्थानचा सर्व निधी त्यांनी आंबेगाव तालुक्यामध्ये वापरला. वळसे पाटील यांनी देवस्थान आंबेगावात कसं नेता येईल, हेच पाहिले, असा आरोप मोहिते यांनी केला.
काय बदल होणार?
भीमाशंकर विकास आराखड्यासाठी एकूण 288 कोटी 17 लाख रुपये मंजुर करण्यात आलेत. या पैशांतून कुंभमेळ्यापूर्वी भीमाशंकर परिसराचा कायापालट करण्यासाठी रस्ते, पार्किंग, रोप-वे, पर्यटन सुविधा आणि मूलभूत सुविधांवर भर देण्यात येणार आहे. मे 2027 पर्यंत विकास आराखड्याचे काम पूर्ण करण्याचे निर्देश आहेत. त्यामुळे भीमाशंकर विकास आराखड्यातून तालुक्यांचा विकास करण्याचा प्रयत्न राजकीय नेत्यांकडून केला जात आहे.
एकीकडं कोट्यवधींचा विकास आराखडा मंजूर होऊन भीमाशंकर परिसराचा कायापालट होणार असताना दुसरीकडे मंदिराच्या हद्दीवरून सुरू झालेला हा वाद राजकीय अस्मितेचा मुद्दा बनलाय. त्यामुळे भीमाशंकर नेमकं खेडचं की आंबेगावचं हा वाद आता आणखी चिघळणार का? या राजकीय वादाचे परिणाम भीमाशंकरच्या विकास आराखड्यावर होतात का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.