राष्ट्रवादी आक्रमक होताच शिंदे एक पाऊल पुढे; सावित्रीबाईंच्या अपमानावरुन दिले कारवाईचे आदेश
Eknath Shinde : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यावर आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या ‘इंडिक टेल्स’ या वेबसाईटवर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्य सचिव मनोज सौनिक यांना दिले आहेत. सावित्रीबाई फुले यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे.
‘इंडिक टेल्स’ या वेबसाईटने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी प्रसिद्ध केलेल्या लेखामध्ये त्यांच्याबद्दल अनेक आक्षेपार्ह गोष्टी लिहिल्या आहेत. या गोष्टीबाबत अनेक राजकीय, सामाजिक संस्थांनी शासनाकडे आक्षेप नोंदवले. या आक्षेपांची दखल घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या वेबसाईटवरील मजकूर तपासून त्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
महापुरुषांच्या बाबतीत लिखाण करताना ते अत्यंत अभ्यासपूर्ण असायला हवे, तसेच त्यामधून त्यांचा अवमान होणार नाही याची दक्षता लेखक किंवा प्रकाशन संस्थेने घेणे गरजेचे आहे. महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्यांची शासन गय करणार नाही, असा इशारा देतानाच ‘इंडिक टेल्स’ वरून लिहिण्यात आलेल्या लेखात काही आक्षेपार्ह बाबी असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत.
दरम्यान, क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह लेख लिहिणाऱ्या ‘इंडिक टेल्स’ आणि ‘हिंदू पोस्ट’ वेबसाईटवर बंदी आणण्याची तसेच लेखकांवर व संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची आग्रही मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांची या संदर्भात आज भेट घेतली. यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, माजी मंत्री छगन भुजबळ, खासदार सुनील तटकरे आदी नेते मंडळी उपस्थित होती.