ठरलं! या तारखेच्या आत ठाकरे विरुद्ध शिंदे वादाचा निकाल लागणार
Eknath Shinde Vs Uddhav Thackeray : राज्यातील शिंदे विरुद्ध ठाकरे वादाची केस सर्वोच्च न्यायालयात सुरु आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बाहेर पडत भाजपसोबत सरकार स्थापन केले. यानंतर सर्वोच्च न्यायालयात ठाकरे विरुद्ध शिंदे असा संघर्ष सुरु आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल कुणाच्या बाजूने लागणार याबाबत वेगवेगळे अंदाज लावण्यात येत आहेत. या सर्व प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाचे वकील सिद्धार्थ शिंदे यांनी झी 24 तास या वृत्तवाहिनीशी बोलताना आपले मत व्यक्त केले आहे. या प्रकरणावर काय निकाल लागू शकतो, याविषयी त्यांनी सांगितले आहे.
या संपूर्ण प्रकरणाची सुनावणी संपून 1 महिना झालेला आहे. तरी देखील निकाल यायला एवढा उशीर का होतो आहे, याबाबत शिंदे यांनी आपले मत व्यक्त केले आहे. 15 मे च्या आसपास या केसचा निकाल लागू शकतो. याचे कारण या पाच न्यायमूर्तींपैकी एक जज एम.आर शहा हे 15 मे रोजी रिटायर होणार आहेत. त्यामुळे त्यांच्याऐवजी दुसरे जज आल्यास ही केस पुन्हा पहिल्यापासून सुनावणीस येईल. त्यामुळे 15 मे च्या आत या केसचा निकाल लागेल असे शिंदे म्हणाले आहेत.
Ajit Pawar : कोणाच्या सोईने हा कार्यक्रम करण्यात आला, याची चौकशी करा अन्यथा…
यावेळी त्यांनी एकनाथ शिंदेंसह 16 आमदार अपात्र ठरणार का यावर देखील भाष्य केले आहे. ही फक्त एक शक्यता आहे. हा निर्णय 10 व्या अनुसूचीनुसार विधानसभा अध्यक्षांकडे जातो. त्यामुळे कोर्ट याबाबतचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडे सोपवण्याची शक्यता आहे. पण सुप्रीम कोर्ट देखील याबाबतचा निकाल देऊ शकते, असे त्यांनी सांगितले आहे.
तसेच राज्यात राष्ट्रपती शासन लागू शकते का यावर देखील त्यांनी भाष्य केले आहे. या जजमेंटमध्ये राज्यपाल किंवा अन्य काही जणांवर ताशेरे ओढले जाण्याची शक्यता आहे. त्या ताशाऱ्यांप्रमाणे भाजपदेखील राज्यात राष्ट्रपती राजवट लावू शकते. आत्तापर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाही, मंत्रीमंडळाचा विस्तार झालेला नाही, त्यामुळे याबाबत काहीही होऊ शकते, असे ते म्हणाले आहेत.
Eknath Shinde यांनी बोलावली तात्काळ बैठक, मंत्र्यांनी सांगितलं कारण…
यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात का, याबाबत देखील सांगितले आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन एक मोठी चूकच केली आहे. त्यांना फ्लोअर टेस्टला सामोरे जायला राज्यपालांनी सांगितले होते. पण त्यांनी राजीनामा दिला. ते जर फ्लोअर टेस्टला सामोरे गेले असते तर व्हीप उल्लंघनाचा प्रश्न आला असता व ही केस ठाकरेंच्या बाजून मजबूत झाली असती. पण त्यांनी स्वत:हून राजीनामा दिल्याने कोर्ट त्यांना परत मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसवेल असे वाटत नाही, असे शिंदेंनी सांगितले आहे.