निवडणूक आयोगाचा आज मोठा निर्णय; पाच राज्यांच्या निवडणुकीसह महाराष्ट्रातील पोटनिवडणुकीचीही घोषणा?
आसाम, पश्चिम बंगाल, केरळ,तामिळनाडू आणि पुद्दुचेरी या पाच राज्याच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Election Commission’s big decision today : देशातील पाच महत्वाच्या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम आज जाहीर होण्याची शक्यता आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने आज दुपारी 4 वाजता नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे पत्रकार परिषद बोलावली असून, या परिषदेत आसाम, पश्चिम बंगाल, केरळ,तामिळनाडू आणि पुद्दुचेरी या पाच राज्याच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे देशाच्या राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
या पाच राज्यांसोबतच महाराष्ट्रातील दोन विधानसभेच्या जागांसाठी पोटनिवडणुकीच्या घोषणा देखील आज होऊ शकते. या पोटनिवडणुकांमध्ये अजित पवार आणि शिवाजी कर्डीले यांच्या मतदारसंघाचा समावेश असण्याची शक्यता आहे. दोन्ही नेत्यांच्या अकाली निधनामुळे या जागा रिक्त झाल्या असून, त्यासाठी आज निवडणुकीची घोषणा केली जाऊ शकते.
दरम्यान, या पाच राज्यांच्या विधानसभांच्या कार्यकाळ संपण्याच्या पार्श्वभूमीवर निवडणूक वेळेत घेणे आवश्यक आहे. आसाम विधानसभेचा कार्यकाळ 20 मे 2026 रोजी संपत आहे. केरळ विधानसभेचा कार्यकाळ 23 मे रोजी, तामिळनाडूचा 10 मे रोजी, पश्चिम बंगालचा 7 मे रोजी तर पुद्दुचेरीचा कार्यकाळ 15 जून रोजी संपणार आहे. त्यामुळे संविधानिक तरतुदीनुसार पश्चिम बंगालचा कार्यकाळ संपण्यापूर्वी म्हणजेच 7 मे 2026 पूर्वी या राज्यांतील निवडणूक प्रक्रिया पूर्ण करणे आवशयक आहे.
या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मागील निवडणुकांतील निकाल देखील महत्वाचे मानले जात आहेत. आसाममध्ये 126 जागांसाठी 3 टप्प्यांत मतदान झाले होते. त्यावेळी राष्ट्रीय लोकशाही आघाडीने 75 जागांवर विजय मिळवत सत्ता कायम ठेवली होती आणि भारतीय जनता पक्षाने सलग दुसऱ्यांदा सत्ता मिळवली होती. पश्चिम बंगालमध्ये 294 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी मोठा विजय मिळवत पुन्हा एकदा सत्ता स्थापन केली होती. तृणमूल काँग्रेसने 215 जागा जिंकल्या होत्या, तर भारतीय जनता पक्षाला 77 जागांवर समाधान मानावे लागले होते. बंगालमध्ये त्यावेळी तब्बल आठ टप्प्यांत मतदान झाले होते.
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा वाद कोर्टात, 16 मार्चच्या सुनावणीकडे कुस्तीविश्वाचं लक्ष
तामिळनाडूमध्ये 234 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान झाले होते. त्या निवडणुकीत द्रविड मुनेत्र कळघमने 133 जागांवर विजय मिळवला होता. अण्णा द्रविड मुनेत्र कळघमने 66 जागा जिंकल्या होत्या, तर भाजपला 5 जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर एम. के. स्टॅलिन यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतली होती.
केरळमध्ये 140 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान झाले होते. त्या निवडणुकीत दावे लोकशाही आघाडी म्हणजेच एलडीएफने 99 जागा जिंकत सत्ता कायम ठेवली होती. युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटने 41 जागांवर विजय मिळवला होता, पिनारायी विजयन यांनी सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती.
तर केंद्रशासित प्रदेश असलेल्या पुद्दुचेरीमध्ये 30 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान झाले होते. त्या निवडणुकीत एनडीएने 16 जागा जिंकत सत्ता मिळवली होती, तर युपीएला ९ जागा मिळाल्या होत्या.
या पार्श्वभूमीवर आज निवडणूक आयोग काय घोषणा करतो, किती टप्प्यांत मतदान होणार आणि निवडणुकीची संपूर्ण रूपरेषा कशी असेल याकडे देशभरातील राजकीय पक्ष आणि मतदारांचे लक्ष लागले आहे. तसेच या निवडणुकांना 2026 मधील सर्वात महत्वाच्या राजकीय लढतींपैकी एक मानले जात आहे.
