अखेर राहुरी विधानसभा बिनविरोध नाहीच; राहुरीत भाजपसमोर राष्ट्रवादी, वंचितसह 7 उमेदवारांचे आव्हान

अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी सात उमेदवार रिंगणात उतरल्याने ही लढत आता रंगतदार होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

  • Written By: Published:
Untitled Design 55

Elections will finally be held in Rahuri with 7 candidates : राहुरी विधानसभा पोटावडणुकीबाबत अखेर चित्र स्पष्ट झालं असून, बिनविरोध निवडणुकीच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. अखेरच्या दिवशी सात उमेदवार रिंगणात उतरल्याने ही लढत आता रंगतदार होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. राहुरी मतदारसंघात भाजपचे अक्षय कर्डीले, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे गोविंद मोकाटे, वंचित बहुजन आघाडीचे संतोष चोळके यांच्यासह अपक्ष उमेदवार रावसाहेब खेवरे, सूर्यभान लांबे, महेश हापसे आणि अथर्व म्हसे असे एकूण सात उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. त्यामुळे ही निवडणूक सरळ आणि एकतर्फी न होता बहुकोनी होणार असल्याचं स्पष्ट संकेत मिळत आहेत.

सुरुवातीला ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता वर्तवली जात होती. कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी अचानक माघार घेतली होती. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी तनपुरेंची भेट घेतल्यानंतर त्यांनी 6 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज न भरण्याचा निर्णय घेतला. या घडामोडीनंतर राजकीय वर्तुळात ही निवडणूक बिनविरोध होणार, अशी चर्चा रंगली होती. मात्र, शेवटच्या टप्प्यात राजकारणाला अनपेक्षित वळण मिळालं. शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसने मास्टरस्ट्रोक खेळत गोविंद मोकाटे यांना उमेदवारी जाहीर केली आणि निवडणुकीत ट्विस्ट आला.

त्यामुळे भाजपसमोर थेट लढत उभी राहिली आहे. त्यातच वंचित बहुजन आघाडीनेही संतोष चोळके यांना उमेदवारी देत निवडणूक लढवण्याचा निर्णय कायम ठेवला. त्यामुळे तिसरा महत्त्वाचा पर्याय मतदारांसमोर उभा राहिला आहे. अपक्ष उमेदवारांनीही मोठ्या संख्येने अर्ज दाखल केल्याने मतांचे विभाजन होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एकूणच, बिनविरोध होण्याच्या उंबरठ्यावर असलेली राहुरी पोटनिवडणूक आता बहुरंगी आणि चुरशीची होणार आहे. भाजपचे अक्षय कर्डिले यांच्यासमोर आता केवळ औपचारिक लढत नसून, राष्ट्रवादी आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांमुळे खरी कसोटी लागणार आहे.

आता या निवडणुकीत मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने जातो, आणि स्थानिक समीकरणे कोणाला साथ देतात, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

follow us