एल निनोचे सावट गडद! देशात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाचा हवामान विभागाचा अंदाज, महाराष्ट्रात दुष्काळाची भीती

पत्रकार परिषदेत आयएमडीने सुधारित मान्सून अंदाज जाहीर करत देशात यंदा सरासरीच्या 90 टक्के पाऊस पडेल, असे म्हटले आहे.

  • Written By: Published:
Untitled Design 6 2

Fear of drought in Maharashtra : देशभरात यंदाच्या मान्सूनबाबत चिंताजनक चित्र समोर येत आहे. एल निनोच्या प्रभावामुळे यंदा देशातील सरासरी पर्जन्यमान कमी राहण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने व्यक्त केली आहे.शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत आयएमडीने सुधारित मान्सून अंदाज जाहीर करत देशात यंदा सरासरीच्या 90 टक्के पाऊस पडेल, असे म्हटले आहे. यापूर्वी एप्रिल महिन्यात हवामान विभागाने 92 टक्के पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. मात्र आता या अंदाजात घट करण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी महाराष्ट्रातील पर्जन्यस्थितीबाबत गंभीर निरीक्षणे नोंदवली आहेत. त्यांच्या मते, यंदाच्या मान्सूनवर एक निनोचे स्पष्ट सावट असून महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे. जून महिन्यात एल निनोचा प्रभाव तुलनेने कमी जाणवेल, मात्र जुलै आणि ऑगस्टमध्ये त्याचा प्रभाव वाढू लागेल. सप्टेंबर महिन्यात हा प्रभाव सर्वाधिक तीव्र होण्याची शक्यता असल्याने मान्सूनवर विपरीत परिणाम होऊ शकतो, असे त्यांनी सांगितले.

14 मृत्यूंनी राज्य हादरलं; पुणे विषारी दारू प्रकरणात मुख्य आरोपी कर्नल विरखा सिंहला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

होसाळीकर यांच्या मते, चार महिन्यांच्या मान्सून काळात पावसाचे प्रमाण कमी राहिल्यास त्याचा मोठा परिणाम शेती, पिण्याचे पाणी, वीज निर्मिती आणि आरोग्य व्यवस्थेवर होऊ शकतो. विशेषतः मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची तूट जाणवण्याची शक्यता अधिक आहे. याचे परिणाम पुढील वर्षभर जाणवू शकतात, असा इशारा देखील त्यांनी दिला. याशिवाय, जून महिन्यात काही भागांमध्ये उष्णतेच्या लाटांचा प्रभाव जाणवू शकतो. जून हा मान्सून संक्रमणाचा महिना मानला जातो. 1 जूनला केरळमध्ये दाखल होणारा मान्सून साधारण 40 ते 45 दिवसांत राजस्थानपर्यंत पोहोचतो.

मात्र, मान्सूनच्या प्रगतीला विलंब झाल्यास देशातील अनेक भागांत उष्णतेचा प्रभाव वाढण्याची शक्यता असते. एल निनोची वर्षे ही नेहमीच अधिक उष्ण मानली जातात, असेही होसाळीकर यांनी स्पष्ट केले. दरम्यान, हवामान तज्ज्ञ मयुरेश प्रभुणे यांनीही यंदाच्या मान्सूनबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी सांगितले की, हवामान खात्याने जरी 90 टक्के पावसाचा अंदाज वर्तवला असला तरी सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता तब्बल 60 टक्के आहे. हवामान खात्याच्या निकषांनुसार 90 टक्के पाऊस हा देखील कमी पावसाच्या श्रेणीत मोडतो. त्यामुळे प्रत्यक्षात पावसाचे प्रमाण यापेक्षाही कमी राहू शकते, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली.

प्रभुणे यांच्या मते, सध्या एल निनोचा प्रभाव फारसा तीव्र नसला तरी जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात त्याचा प्रभाव वाढत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह देशातील अनेक भागांमध्ये मान्सून सरासरीपेक्षा कमी राहण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

follow us