मोठी बातमी – पुणे भाजपमध्ये पहिली बंडखोरी; माजी नगरसेवक धनंजय जाधव यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश

माजी नगरसेवक धनंजय जाधव यांच्याकडून भाजपला रामराम ठोकत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश.

  • Written By: Published:
Untitled Design (175)

Former corporator Dhananjay Jadhav joins Ajit Pawar’s NCP : आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, भाजपला आज मोठा धक्का बसला आहे. भाजपमधील(BJP) पहिली मोठी बंडखोरी उघडपणे समोर आली असून, प्रभाग क्रमांक 27 मधून तिकीट नाकारण्यात आलेले माजी नगरसेवक धनंजय जाधव(Dhananjay Jadhav) यांनी भाजपला रामराम ठोकत अजित पवार(Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस(NCP) पक्षात अधिकृत प्रवेश केला आहे. धनंजय जाधव हे भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या पर्वती नवी पेठ या प्रभागातून उमेदवारीसाठी इच्छुक होते. गेल्या काही दिवसांपासून ते या प्रभागात सक्रिय होते. स्थानिक कार्यकर्त्यांशी बैठका, संपर्क दौरे आणि संघटनात्मक कामातून त्यांनी आपली तयारीही दाखवून दिली होती. मात्र, भाजपच्या अंतिम उमेदवार यादीत त्यांचं नाव वगळण्यात आल्याने जाधव नाराज झाले होते.

या नाराजीतूनच आजचा मोठा राजकीय निर्णय घेत धनंजय जाधव थेट अजित पवार यांच्या जिजाई निवासस्थानी दाखल झाले. त्यानंतर काही वेळातच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली. या पक्षप्रवेशामुळे भाजपमधील अंतर्गत मतभेद आणि गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. धनंजय जाधव यांनी प्रवेशानंतर प्रतिक्रिया देताना सांगितले की, “मी गेली अनेक वर्षे भाजपसाठी प्रामाणिकपणे काम केलं. मात्र, स्थानिक कार्यकर्त्यांच्या भावना आणि माझ्या कामाची दखल न घेता तिकीट नाकारण्यात आलं. त्यामुळे जनतेसाठी काम करण्याची संधी मिळावी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.”

पुण्यात ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसचं ठरलं; महापालिका निवडणुकांना सोबतच सामोरे जाणार

दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी हा प्रवेश आगामी महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे. विशेषतः पर्वती नवी पेठ परिसरात भाजपची पकड मजबूत मानली जाते. अशा परिस्थितीत भाजपच्या माजी नगरसेवकाचा राष्ट्रवादीत प्रवेश हा भाजपसाठी धोक्याची घंटा आहे. या घडामोडीनंतर भाजपच्या स्थानिक नेतृत्वात अस्वस्थता पसरली असून, उमेदवारी न मिळाल्याने नाराज असलेले आणखी काही इच्छुक नेतेही पक्षांतराच्या तयारीत असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. त्यामुळे भाजपसमोर बंडखोरी रोखण्याचं मोठं आव्हान उभं राहिलं आहे.

दरम्यान, धनंजय जाधव यांच्या पक्षप्रवेशामुळे प्रभाग क्रमांक 27 मधील राजकीय समीकरणं पूर्णपणे बदलण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांत या बंडखोरीचे पडसाद इतर प्रभागांमध्येही उमटतात का, याकडे पुण्याच्या राजकारणाचं लक्ष लागून राहिलं आहे.

follow us