माजी खासदार डॉ. जनार्दन वाघमारे यांचं निधन, वयाच्या 91 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
शिक्षणतज्ज्ञ ज्येष्ठ साहित्यिक आणि माजी कुलगुरू डॉ. जनार्दन वाघमारे यांचं लातूर येथे निधन झालं आहे.
शिक्षणतज्ज्ञ ज्येष्ठ साहित्यिक आणि माजी कुलगुरू डॉ. जनार्दन वाघमारे यांचं लातूर येथे निधन झालं आहे. (Waghmare) वयाच्या 91 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वाघमारे यांचं मराठी साहित्य, दलित चळवळ आणि शिक्षण क्षेत्रातील योगदान उल्लेखनीय आहे.
जनार्धन वाघमारे हे लातुरचे पहिले नगराध्यक्ष होते. यांची संसदीय कारकीर्दही कौतुकास्पद आहे. पुरोगामी विचारांवर त्यांची पकड होती. शिक्षण, कृषि, साहित्य, कला आणि राजकारण व समाजकारण यांसारख्या क्षेत्रात डॉ. वाघमारे यांचा मुक्त संचार होता. त्यावर आधारित अनेक ग्रंथांचीही त्यांनी निर्मिती केली. समाजप्रबोधन केले.
ज्येष्ठ प्रकाशक अरविंद पाटकर यांचे निधन; मराठी साहित्य आणि प्रकाशन क्षेत्रातून हळहळ व्यक्त
शिक्षण क्षेत्राच्या विकासासाठी अनेकदा त्यांनी परदेश दौरे केले. शिक्षण क्षेत्रात अमूलाग्र बदल घडवून आणले. डॉ. वाघमारे यांचे मराठी भाषेवर विशेष प्रेम होते. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडचे संस्थापक कुलगुरू आणि लातूरच्या राजर्षी शाहू महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणूनही त्यांनी केलेले कार्य कायम स्मरणात राहील. मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये उच्च स्थान मिळवून देणारे लातूर पॅटर्न शैलीचे शिल्पकार आणि मराठवाडा एज्यूकेशन कोन्क्लेव्ह २०२५ चे मार्गदर्शक म्हणून त्यांची ओळख अजरामर आहे.
मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली
विद्वत्ता, तत्वनिष्ठ आणि, लोकाभिमुखता यांचा त्रिवेणी संगम असलेल्या माजी खासदार प्रा. डॉ. जनार्दन वाघमारे यांच्या निधनामुळे शिक्षण, राजकारण आणि समाजकारण यांना जोडणारा मार्गदर्शक असा दुवा निखळला आहे, अशी भावना व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ विचारवंत, माजी खासदार, माजी कुलगुरू डॉ. जनार्दन वाघमारे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
प्रा. डॉ. वाघमारे यांचा इंग्रजी भाषा आणि साहित्यासह अर्थशास्त्र, राज्यशास्त्राचा गाढा अभ्यास होता. शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी अध्यापन आणि प्रशासन या अंगाने मोठा ठसा उमटवला. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू म्हणूनही त्यांनी प्रभावी कार्य केले. विशेष म्हणजे त्यांनी लातूरचे पहिले लोकनियुक्त नगराध्यक्षपदही भुषविले. या काळात त्यांनी शहराच्या विकासासाठी लातूर व्हिजन म्हणून आराखडा तयार केला. शहरातील स्वच्छता, पाणी पुरवठा तसेच नागरी सुविधांसाठी प्रयत्न केले. त्यामुळे लातूरला तत्कालीन संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियानात प्रथम पुरस्कार देखील मिळाला होता. राज्यसभा सदस्य म्हणूनही त्यांनी विविध संसदीय समितीवर काम केले असंही ते म्हणाले.
