राज ठाकरेंची औलाद काय भाषा बोलते? गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून अमित ठाकरे यांची खिल्ली उडवत जोरदार टीका
याचवेळी त्यांनी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या परिवहन खात्याच्या निर्णयावरही आक्षेप घेतला.
Gunaratna Sadavarate criticizes Amit Thackeray : मुंबईत रिक्षा-टॅक्सी संपाच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, अमित ठाकरे यांच्या वक्तव्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. संपाच्या काळात मराठी रिक्षाचालकांना कोणी अडवले तर मनसे स्टाईलने धडा शिकवू असा इशारा अमित ठाकरे यांनी दिला होता. या वक्तव्यावरून वकील आणि सामाजिक कार्यकर्ते गुणरत्न सदावर्ते यांनी जोरदार टीका करत त्यांची खिल्ली उडवली.
शुक्रवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना सदावर्ते यांनी थेट सवाल केला की, राज ठाकरेंची औलाद काय भाषा बोलते? मारून काढू असे म्हणणं योग्य आहे का? अमित ठाकरे हवालदार झालेत का, की आरटीओचे शिपाई? त्यांनी पुढे उपरोधिक टीका करत विचारलं की, अमित ठाकरे यांना मारहाणीचा बॅच मिळालाय का? अशा प्रकारची भाषा सुज्ञपणाची नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
याचवेळी त्यांनी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या परिवहन खात्याच्या निर्णयावरही आक्षेप घेतला. रिक्षाचालकांना आदराने रिक्षावाले साहेब म्हणावे, असे सांगत त्यांनी प्रश्न उपस्थित केला की, कोणी कुठे राहावं आणि कुठे पोट भरावं हे ठरवणारे तुम्ही कोण? कष्टकरी वर्ग स्वतःच्या मेहनतीवर जगतो, त्यासाठी कोणत्याही यंत्रणेची गरज नसते, असेही त्यांनी नमूद केले.
सोने-चांदीच्या दरात घसरण; सोनं 1200 रुपयांनी स्वस्त तर चांदी….
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनाही त्यांनी अप्रत्यक्षपणे लक्ष्य करत, परिवहन खात्याचे काम सोडून शालेय शिक्षण विभागाचे काम करत आहेत का? असा टोला लगावला. तसेच संजय निरुपम यांनीही या निर्णयाविरोधात भूमिका घेतल्याचा उल्लेख त्यांनी केला. भाषेच्या मुद्द्यावर बोलताना सदावर्ते म्हणाले की, एखादी भाषा शिकवण्यासाठी गोडवा आवश्यक असतो. सध्याच्या राजकीय वातावरणात तो गोडवा दिसत नाही. छडीने भाषा शिकवता येत नाही. त्यांनी भोजपुरी भाषेला संविधानाच्या अनुसूचीमध्ये स्थान देण्याची मागणीही केली, तर मराठी भाषेच्या सौंदर्याबद्दल कोणाचाही मतभेद नसल्याचेही स्पष्ट केले.
दरम्यान, या वादाला आणखी रंग चढला तो सदावर्ते यांना मिळालेल्या धमक्यांमुळे. गुरुवारी काही मनसे पदाधिकाऱ्यांनी त्यांना रस्त्यात अडवून विरोध दर्शवला होता. तुम्हाला मराठी येत नाही का? असा सवाल करण्यात आला असता, सदावर्ते यांनी तुला जे बोलायचं ते बोल, मला जे बोलायचं ते मी बोलेन असे प्रत्युत्तर दिले. या घटनेनंतर सदावर्ते यांना धमकीचे फोन येऊ लागले असून परिस्थिती लक्षात घेता मुंबई पोलिसांनी त्यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे. सध्या या प्रकरणामुळे राजकीय वातावरण अधिकच तापले असून, भाषा, ओळख आणि कष्टकरी वर्गाच्या हक्कांचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.