पवनराजे हत्याकांडात हजारेंची साक्ष का ? पद्मसिंह पाटलांचं मंत्रिपद अण्णांमुळे कसं गेलं ?
Pawanraje Nimbalkar Case: भ्रष्टाचारात पद्मसिंह पाटील दोषी ठरल्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. याचा राग मनात धरला होता-हजारे
Pawanraje Nimbalkar Case : काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर (Pawanraje Nimbalkar Case) व त्यांचे चालक समद काझी यांचा हत्या प्रकरणाचा निकाल लागलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी गृहराज्यमंत्री पद्मसिंह पाटील (Padamsinh Patil) यांच्यासह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाली. जून 2006 मध्ये नवी मुंबईतील कळंबोली येथे गोळ्या झाडून हत्या झाल्यानंतर तब्बल 20 वर्षांनी या प्रकरणाचा निकाल लागलाय. यात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे ( Anna Hazare) यांचीही साक्ष झाली होती. हजारे यांच्या आंदोलनाचा संबंध यात होता. त्यामुळे हजारे यांची साक्ष महत्वाची मानली. हजारेंमुळे पद्मसिंह पाटलांना मंत्रिपद गमवावे लागले होते. (How Did Padamsinh Patil Lose His Ministerial Post Because of Anna Hazare?
अण्णा हजारे यांचा संबंध कसा आला ?
त्या काळात अण्णा हजारे यांची भष्टाचाराच्या विरोधात आंदोलने जोरात सुरू होती. काही मंत्र्यांविरूद्ध हजारे यांनी आरोप करून उपोषण केले होते. त्यावेळी धाराशीव जिल्ह्यात चुलत भाऊ असलेला पद्मसिंह पाटील आणि पवनराजे निंबाळकर यांच्यात वाद पेटला होता. त्यामुळे पवनराजे यांनी पाटील यांच्या विरोधातील काही प्रकरणे हजारे यांना आणून दिली होती. त्याआधारे हजारे यांनी पाटील यांच्याविरोधातही आंदोलन सुरू केले. पद्मसिंह पाटील पाटबंधारे मंत्री होते. 2005 मध्ये झालेल्या तेरणा स्ट्रस्टसह तेरणा कारखाना साखर घोटाळा, कारगील निधी यामध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप हजारे यांनी केला होता. पाटील हे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नातेवाईक होते. त्यावेळी हजारे यांनी शरद पवारांनाही घेरले होते.
पारसमल जैनच्या जबाबातून हजारेंची सुपारी दिल्याचे उघडकीस
भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर पवनराजे यांची मुंबईत हत्या झाली. वेळी यात पकडला गेलेला आरोपी पारसमल जैन यांनी आपल्या जबाबात पाटील यांच्यासोबत हजारे यांना मारण्यासाठीही सुपारी दिल्याचा उल्लेख केला होता. हजारे यांना आलेल्या धमकीसंबंधी त्यांनी पारनेर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.
काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर यांच्या हत्या प्रकरणात जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांना सरकारी साक्षीदार करण्यात यावे, अशी मागणी करत निंबाळकर यांच्या पत्नी आनंदीदेवी निंबाळकर यांनी केली होती. त्यासाठी त्यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. अण्णा हजारे यांची साक्ष या खटल्यात महत्त्वपूर्ण असून यातून काहीतरी नवी माहिती मिळू शकते, असा दावा आनंदीदेवी निंबाळकर यांनी या याचिकेत केला. त्यानंतर हजारे यांना साक्षीदार करण्यात आले.
अण्णा हजारे यांनी कोर्टात काय सांगितले…
सुमारे सात वर्षांपूर्वी 2019 मध्ये हजारे यांची साक्ष नोंदविण्यात आली. त्यात हजारे यांनी यातील मुख्य आरोपी पद्मसिंह पाटील यांना लोकप्रतिनिधी म्हणून ओळखत असल्याचे सांगितले. पाटील यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होते. त्याच प्रकरणांच्या चौकशीसाठी मी आंदोलन केले होते. यानंतर सुप्रीम कोर्टाचे निवृत्त न्यायाधीश पी. बी. सावंत यांच्या नेतृत्वाखाली चौकशी समिती स्थापन झाली होती. त्यानंतर जेव्हा पवनराजे निंबाळकर यांची हत्या झाली, त्यावेळी प्रसार माध्यमांतून मला माहिती मिळाली की, पवनराजे निंबाळकर यांच्या मारेकऱ्यांना माझ्याही हत्येची सुपारी देण्यात आली होती. त्यावर मी पारनेर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती. यासंदर्भात सरकारलाही पत्र पाठवले होते. परंतु, माझ्या तक्रारीची दखल घेण्यात आली नाही. भ्रष्टाचारात पद्मसिंह पाटील दोषी ठरल्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. याचा राग मनात धरून, पद्मसिंह पाटलांनी मला जिवे मारण्याची धमकी देत माझी सुपारी दिली होती. तसेच ही तक्रार मागे घ्यावी म्हणून माझ्यावर दबाव टाकला जाऊ लागला. एकदा माझ्या ऑफिसमध्ये येऊन पद्मसिंह पाटलांच्या माणसांनी माझ्या कार्यकर्त्यांकडे एक कोरा चेक सोपवला, आणि सांगितलं हवी ती किंमत टाका, मी याचीही रितसर तक्रार दाखल केली, असं अण्णांनी आपल्या जबानीत कोर्टाला सांगितलं.
ही माहिती आपल्याला कोणी दिली, याविषयी अण्णा हजारेंना विचारणा केली असता त्यांनी कार्यकर्त्यांनी सांगितल्याची माहिती कोर्टाला दिली. मात्र कार्यकर्त्याचं नाव विचारलं असता अण्णा हजारेंना उत्तर देता आलं नाही. या खटल्याचा निकाल देताना न्यायालयाने माफीचा साक्षिदार आणि अन्य साक्षीही पुरेशा नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे सबळ पुराव्याअभावी आरोपींची सुटका करण्यात आली आहे.