HSC Exam : पहिल्याच दिवशी इंग्रजी प्रश्नपत्रिकेत मोठी चूक… प्रश्नाऐवजी उत्तरचं छापले!

  • Written By: Published:
HSC English Paper

पुणे : राज्यात मंगळवारपासून (दि. 21) बारावी बोर्डाची (HSC Exam) परीक्षा सुरु झाली आहे. कोविडनंतर यंदा प्रथमच १०० टक्के अभ्यासक्रमावर परीक्षा होत आहे. राज्यातील 3 हजार 195 केंद्रावर ही परीक्षा आयोजित करण्यात आली असून राज्यात जवळपास साडेचौदा लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. मात्र, परीक्षेच्या पहिल्याच दिवशी इंग्रजी (English Paper) विषयात गंभीर चूक (Mistake) समोर आली आहे. इंग्रजी विषयाच्या प्रश्न पत्रिकेमध्ये प्रश्न क्रमांक 03 च्या À3 to A5 या क्रमांकाच्या प्रश्नाऐवजी थेट उत्तर छापण्यात आल्याने बोर्डाच्या कामाची गंभीर चूक समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी (Sharad Gosavi) आणि सचिव अनुराधा ओक (Anuradha Oak) यांनी संयुक्त सभेच्या अहवालानुसार राज्यातील विद्यार्थ्यांना त्रुटी दूर करून योग्य न्याय दिला जाईल, असे म्हटले आहे.

पहिल्याच दिवशी इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत प्रश्न क्रमांक 03 च्या À3 to A5 या क्रमांकाच्या प्रश्नाऐवजी थेट उत्तर छापण्यात आले आहे. यावर खुलासा करताना राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी यासंदर्भात एक जाहीर पत्रक काढले आहे. ओक यांनी सांगितले की, प्रचलित पद्धतीप्रमाणे इंग्रजी विषयाच्या शिक्षकांची विषय तज्ज्ञ् आणि विभागीय मंडळाच्या प्रमुखांबरोबर सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र, शिक्षकांचा आपल्या धोरणात्मक मागण्या संदर्भात बहिष्कार असल्याने आजची सभा झाली नाही. त्यामुळे आजची सभा पुन्हा एकदा बोलावण्यात येईल. त्यात आज पार पडलेल्या इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील त्रुटी बाबत दखल घेतली जाईल. संयुक्त सभेच्या अहवालानुसार राज्यातील विद्यार्थ्यांना योग्य न्याय दिला जाईल. याबाबत लवकरच निर्णय जाहीर करू, असे त्यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण अशा एकूण नऊ विभागीय मंडळामार्फत या लेखी परीक्षेचे नियोजन करण्यात आले आहे. 10 हजार 388 कनिष्ठ महाविद्यालयात ही परीक्षा होत आहे. यामध्ये विज्ञान शाखेचे 6 लाख 60 हजार 780 विद्यार्थी, कला शाखेचे 4 लाख 4 हजार 761 विद्यार्थी, वाणिज्य शाखेचे 3 लाख 45 हजार 532 विद्यार्थी तर आयटीआयचे 3 हजार 261 विद्यार्थी असे एकूणपुणे विभागात 14 लाखांहुन अधिक विद्यार्थी ही लेखी परीक्षा देत आहेत.

राज्यात सर्वाधिक मुंबई विभागीय मंडळात 3 लाख 40 हजार 953 विद्यार्थी तर पुणे विभागीय मंडळात 2 लाख 48 हजार 357 विद्यार्थी परीक्षा देत आहे. तर सर्वात कमी कोकण विभागीय मंडळात 26 हजार 423 विद्यार्थी ही परीक्षा देत आहे.

Tags

follow us