हैदराबाद गॅझेटची आमची कायम तयारी होती; पण.., आंदोलनावर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

Devendra Fadnavis And Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी गेली पाच दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानात उपोषण सुरु केलं होतं. त्या आंदोलन आज सरकारने जरांगे (Jarange) यांच्या मागण्या मान्य करत सोडवलं आहे. आता जरांगे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. सरकारच्या या शिष्टाईचे श्रेय त्यांनी मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीला दिले आहेत. मी प्रत्येक समाजासाठी काम करत राहील, असंही फडणवीस यांनी सांगितलं आहे.
अखेर जरांगे पाटलांच्या आंदोलनाला यश, आंदोलक गावाच्या दिशेने निघाले, पाटील उपचारांसाठी रुग्णालयात
मनोज जरांगे यांनी उपोषण सोडलं याचा मला आनंद आहे. मंत्रिमंडळ उपसमितीने आज मराठा समाजाच्या हितासाठी चांगला तोडगा काढला याचाही मला आनंद आहे. जरांगे यांचे उपोषण आता संपलेले आहे. खरं म्हणजे हैदराबाद गॅझेट लागू करण्यासाठी आमची सुरुवातीपासूनच तयारी होती. पण मनोज जरांगे यांची सरसकट कुणबी प्रमाणत्र द्यावे या मागणीला कायदेशीर अडचणी होत्या. सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाचे निर्णय लक्षात घेता सरसकट मराठा समाजाला आरक्षण देणे शक्य नव्हते, अशी पहिली प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
मनोज जरांगेंनी भूमिका समजून घेतली
हीच वस्तूस्थिती जरांगे यांच्या टीमच्या लक्षात आणून देण्यात आले. आपल्या कायद्याप्रमाणे, देशाच्या संविधानाप्रमाणे आरक्षण हे समूहाला नव्हे तर व्यक्तीला मिळत असते. संबंधित व्यक्तीने ते आरक्षण मागायचं असायचं. म्हणूनच सरसकट आरक्षण कायद्याच्या पताळीवर टिकणार नाही, हे जरांगे यांच्या टीमला सांगण्यात आले. जरांगे यांनीदेखील ही भूमिका समजून घेतली. कायद्यात सरसकट आरक्षण बसत नसेल तर ते करू नका असे जरांगे यांनी सांगितले. त्यानंतर मंत्रिमंडळ उपसमितीने चर्चा केली आणि जीआर तयार झाला, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.