आमची सरकार आणा, जुनी पेन्शन योजना लागू करतो, उद्धव ठाकरेंची कर्मचाऱ्यांना ग्वाही
Uddhav Thackeray : आमची सरकार आणा, जुनी पेन्शन योजना लागू करतो अशी ग्वाही राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना दिली आहे. ते आज कोपरगाव येथे जुनी पेन्शन संघटनेच्या अधिवेशनात बोलत होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर देखील जोरदार टीका केली.
या अधिवेशनात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, जुनी पेन्शन योजना (Old Pension Scheme) आपण सगळे खेचून आणू. तुमची एकजूट पाहता हे सरकार गेल्यातच जमा आहे. विधानसभा निवडणुकीत आमचे सरकार आणा, जुनी पेन्शन योजना अंमलात आणतो. सरकारच्या सर्व योजना तुम्ही राबवणारे आहात, लोकांच्या घराघरात जाऊन तुम्ही सरकारचे काम करता मात्र तरीही देखील योजनेच्या पोस्टरवर फोटो या दाढीवाल्यांचे लागतात असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाण साधला.
तर दुसरीकडे या अधिवेशनात बोलताना त्यांनी लाडकी बहीण योजनेवरून देखील सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ज्यांना बहिणी आहे हे माहिती नव्हते त्यांनी निवडणुका जवळ आल्याने लाडकी बहीण योजना काढली, कोरोना काळात तुम्ही सगळ्यांनी जीवावर उदार होऊन कामे केली म्हणून महाराष्ट्र वाचला, तरीही सुद्धा सरकार तुमच्या हक्काची पेन्शन देत नाही, तुम्ही आपले सरकार पुन्हा आणा आम्ही तुम्हाला तुमच्या हक्काची पेन्शन मिळवून देऊ, असे आश्वासन देखील यावेळी उद्धव ठाकरे यांनी कर्मचाऱ्यांना दिले.
Tata- Mahindra ची धाकधूक वाढणार, मारुती लाँच करणार 3 जबरदस्त इलेक्ट्रिक कार
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, माझा पक्ष चोरला, चिन्ह चोरला आणि वडील देखील चोरले आणि तरी देखील तुम्ही माझ्याकडे मागत आहात. मला दिवार चित्रपटातील डायलॉग आठवला. आज मिंधे वगेरे मला सांगत आहेत, मेरे पास पार्टी है, मेरे पास सत्ता है, तेरे पास क्या है? मी त्यांना सांगतो माझ्याकडे ईमान आहे.
तुम्हाला सर्वांना कल्पना आहे आज माझ्याकडे काहीच नाही तरीही देखील तुम्ही मला बोलावत आहार आणि मी सुद्धा आलो कारण मला सत्तेची पर्वा नाही, मला तुमच्या आयुष्याची चिंता आहे. सत्ता येते आणि जाते, गेलेली सत्ता पुन्हा येणार आहे आणि मी तुम्हाला न्याय देणार असा शब्द माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलताना कर्मचाऱ्यांना दिला.