पानिपतमधील शौर्यदिनाचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना निमंत्रण
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हरियाणातील पानिपतमध्ये आयोजित शौर्यदिनाच्या कार्यक्रमाचं निमंत्रण पाठवण्यात आलं आहे. 14 जानेवारीला या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी एकनाथ शिंदे पानिपतला जाण्याची शक्यता आहे.
14 जानेवारी रोजी हरियाणाच्या पानिपतमध्ये मराठ्यांच्या शौर्याचं जागर केला जाईल. त्याचं निमंत्रण मुख्यमंत्र्यांना देण्यात आलं आहे. कार्यक्रमाला महाराष्ट्रातील शिवप्रेमी देखील उपस्थित राहणार असल्याचं कळतं. शौर्य स्मारक समितीच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.
या कार्यक्रमासाठी हरियाणा राज्याचे राज्यपाल बंडारु दत्तात्रय, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, हरियाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांच्यासह केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, भागवत कराड, विनोद तावडे, राहुल शेवाळे यांना आमंत्रण देण्यात आलं आहे.
1761 मध्ये पानिपतमध्ये झालेल्या लढाईचा शौर्य दिवस गेल्या काही वर्षांपासून साजरा केला जात आहे. पानिपतमधील काला आम या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार येतो. या वर्षाच्या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आमंत्रित करण्यात आलं आहे.
या कार्यक्रमाला एकनाथ शिंदे उपस्थित राहिले तर हे महाराष्ट्राचे पहिलेच मुख्यमंत्री ठरतील. याआधी प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती असताना शौर्यदिनाच्या कार्यक्रमला हजर राहिल्या होत्या.