‘इकडे बघ’ म्हणत जयराजेंची खुन्नस; जयराजे निंबाळकर आणि राणा जगजितसिंह पाटील आमनेसामने

जयराजे निंबाळकरआणि भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील हे एकमेकांसमोर आल्याने काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.

  • Written By: Published:
Untitled Design 17

Jayaraje Nimbalkar and Rana Jagjitsinh Patil face to face : धाराशिव जिल्ह्यातील राजकारणात अत्यंत प्रतिष्ठेचे मानले जाणारे जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान शुक्रवारी मोठा राजकीय थरार पाहायला मिळाला. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन प्रभावी राजकीय घराण्यांमधील तणाव पुन्हा एकदा समोर आला. उबाठा गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचे बंधू जयराजे निंबाळकरआणि भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील हे एकमेकांसमोर आल्याने काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.

जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निकाल जाहीर होण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि मल्हार पाटील हे जिल्हा परिषद इमारतीतून बाहेर पडत असताना समोरून जयराजे निंबाळकर आपल्या समर्थकांसह येताना दिसले. राणा पाटील दिसताच जयराजे निंबाळकर यांनी मागे वळून “इकडे बघ” असे म्हणत त्यांना जाहीरपणे डिवचल्याचे सांगितले जाते.

स्वच्छ अभियानात 12 हजार कोटींचा महाघोटाळाच; मंत्र्यांचे अधिकारी टक्केवारी घेतात, वडेट्टीवारांचा गंभीर आरोप

समोर आलेल्या व्हिडिओनुसार, दोघेही एकमेकांकडे न पाहता पुढे जात होते. मात्र, एकमेकांच्या बाजूने जात असताना जयराजे निंबाळकर आणि राणा जगजितसिंह पाटील यांचे खांदे एकमेकांना लागल्याचे दिसून आले. या प्रकारामुळे दोन्ही गटांच्या समर्थकांमध्ये तणाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, परिस्थिती चिघळू न देता आमदार राणा पाटील यांनी संयमाची भूमिका घेत जयराजेंच्या या कृतीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आणि ते शांतपणे पुढे निघून गेले. त्यांच्या या भूमिकेमुळे संभाव्य मोठा वाद किंवा गोंधळ टळल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तिथे तैनात असलेल्या पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप केला. जयराजे निंबाळकर आणि त्यांच्या समर्थकांची गर्दी वाढू नये म्हणून पोलिसांनी त्यांना पोलीस बंदोबस्तात तिथून बाहेर काढले. निंबाळकर आणि पाटील या दोन्ही घराण्यांमधील जुने राजकीय वैर या घटनेनंतर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. या घटनेची चर्चा सध्या संपूर्ण धाराशिव जिल्ह्यात रंगली असून राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

follow us