इथून पुढे औकातीत राहून बोलायचं, तोंड सांभाळून बोलायचं, संजय राऊतांवर ज्योती वाघमारेंनी साधला निशाणा

खासदार ज्योती वाघमारे यांनी पहिल्यांदाच प्रमुख मंचावरून भाषण करत ठाकरे गट आणि खासदार संजय राऊत यांच्यावर अत्यंत आक्रमक शब्दांत निशाणा साधला.

  • Written By: Published:
Untitled Design 20

Jyoti Waghmare criticizes Sanjay Raut : शिवसेनेच्या 60 व्या वर्धापनदिन सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने जोरदार शक्तिप्रदर्शन केले. या सोहळ्यात राज्यसभा खासदार ज्योती वाघमारे यांनी पहिल्यांदाच प्रमुख मंचावरून भाषण करत ठाकरे गट आणि खासदार संजय राऊत यांच्यावर अत्यंत आक्रमक शब्दांत निशाणा साधला. आपल्या संघर्षमय राजकीय प्रवासापासून ते ‘ऑपरेशन टायगर’पर्यंत विविध मुद्द्यांवर भाष्य करत त्यांनी शिंदे यांच्या नेतृत्वाचे जोरदार समर्थन केले.

भाषणाच्या सुरुवातीलाच ज्योती वाघमारे यांनी आपल्या आयुष्याचा प्रवास उलगडून सांगितला. तीन वर्षांपूर्वी सोलापूरच्या चळवळीत काम करणारी एक सर्वसामान्य घरातील मुलगी शिंदे साहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन शिवसेनेत आली. आर्थिकदृष्ट्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत वाढलेली, पण विचारांनी समृद्ध असलेली ही लेक आज राज्यसभेची खासदार म्हणून या मंचावर उभी आहे. हे केवळ माझे यश नसून बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे यश आहे, असे त्या म्हणाल्या.

यावेळी त्यांनी घराणेशाहीच्या मुद्द्यावरून विरोधकांवर टीका केली. महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक नेत्यांनी आपल्या मुलांना, मुलींना, नातवंडांना मोठी पदे दिली. अनुभव नसतानाही कॅबिनेट मंत्री बनवले, खासदार बनवले. पण एका सर्वसामान्य कुटुंबातील महिलेला राज्यसभेपर्यंत पोहोचवण्याचे धाडस आणि विश्वास एकनाथ शिंदे यांनी दाखवला. हीच खरी शिवसेनेची ताकद आहे, असे त्या म्हणाल्या.

उद्धवजी, तुमच्या आजूबाजूचे लोक तुम्हाला फसवत आहेत’; 6 नव्हे तर 7 खासदार फुटले होते, रामदास कदमांचा सनसनाटी दावा

दरम्यान, राज्याच्या राजकारणात सध्या चर्चेचा विषय ठरलेल्या ‘ऑपरेशन टायगर’वरही त्यांनी भाष्य केले. आज एका बाजूला शिवसैनिकांचा महासागर इथे जमला आहे, तर दुसऱ्या बाजूला काही लोक गटप्रमुखांच्या बैठका घेत आहेत. ऑपरेशन टायगरवरून अनेकजण टीका करत आहेत. मात्र आमच्यासाठी ऑपरेशन टायगर म्हणजे फक्त एका पक्षातील लोकांना दुसऱ्या पक्षात आणण्याची मोहीम नाही. हा विचारांचा विस्तार आहे. जनतेच्या विश्वासाचा विजय आहे, असे त्या म्हणाल्या.

यानंतर त्यांनी थेट संजय राऊत यांच्यावर हल्ला चढवला. सतत बेताल वक्तव्य करणारे संजय राऊत म्हणतात, खासदारांच्या अंगावरील चिंध्या शिल्लक ठेवू नका. पण मी त्यांना सांगू इच्छिते, आधी तुमच्या पक्षाच्या झालेल्या चिंध्या गोळा करा. कारण महाराष्ट्राच्या राजकारणात संजय राऊत हे चिंधीचोर राजकारणी म्हणून ओळखले जातात, अशी टीका त्यांनी केली.

राऊत यांच्यावर टीका करताना त्यांनी पुढे म्हटले, तुमच्या शिव्याशापामुळे किंवा धमक्यांमुळे आमचे ऑपरेशन थांबणार नाही. उलट तुमच्या पक्षातच ऑपरेशन बुडवा सुरू झाले आहे. रोज नवे लोक नाराज होत आहेत, रोज नवे चेहरे दूर जात आहेत. त्यामुळे इतरांवर टीका करण्याऐवजी स्वतःच्या पक्षाकडे लक्ष द्या. आपल्या आक्रमक शैलीत त्यांनी आणखी एक पाऊल पुढे टाकत, राजकारणात फक्त तोंडात दम असून चालत नाही, मनगटातही ताकद लागते. तुम्ही सतत मोठमोठ्या घोषणा करता, पण त्यासाठी आवश्यक धैर्य आणि ताकद तुमच्याकडे नाही. तुमच्याकडे कलेजा नाही आणि भेजाही नाही, असा टोला लगावला.

ज्या माणसाला मोटारसायकल चालवायचं लायसन नव्हत त्याला ट्रकच लायसन दिलं; गुलाबराव पाटलांची ठाकरेंवर टीका

तसेच त्यांनी संजय राऊत यांच्या राज्यसभा सदस्यत्वावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पहिले तुम्ही राजीनामा द्या. कारण तुम्ही आमच्या 40 आमदारांच्या मतांवर खासदार झाला आहात. आज नैतिकतेच्या गप्पा मारणाऱ्यांनी स्वतःच्या राजकीय प्रवासाचाही विचार करावा, असे आव्हान त्यांनी दिले.

भाषणादरम्यान ठाकरे गटावर निशाणा साधताना त्यांनी वाघाचं कातडं पांघरलेले लबाड लांडगे” अशी टीका केली. तसेच, इथून पुढे औकातीत राहून बोला. तोंड सांभाळून बोला. अन्यथा उत्तर कसे द्यायचे हे शिवसैनिकांना वेगळे शिकवण्याची गरज नाही, असा इशाराही त्यांनी दिला. काँग्रेससोबतच्या ठाकरे गटाच्या राजकीय संबंधांवरूनही त्यांनी टीका केली. शिवसेनेच्या विचारांपेक्षा काँग्रेसची भाटगिरी करण्यात काही लोक धन्यता मानत आहेत. बाळासाहेबांच्या विचारांची भाषा करणाऱ्यांनी आधी आपल्या कृतीकडे पाहावे, असे त्या म्हणाल्या.

दरम्यान, ज्योती वाघमारे यांच्या या भाषणाने शिवसेनेच्या वर्धापनदिन सोहळ्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले. ‘ऑपरेशन टायगर’, ठाकरे गटातील कथित नाराजी आणि आगामी राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर केलेल्या या वक्तव्यांमुळे राज्यातील राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. आता ज्योती वाघमारे यांच्या या आरोपांना ठाकरे गट आणि संजय राऊत काय प्रत्युत्तर देतात, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

follow us