Kharif Crops : जुलैच्या पावसाने खरीपाला दिला जीवदान; 70 टक्के पेरण्या पूर्ण
Kharif Crops : जून महिन्यात पावसाने पाठ फिरवल्याने चिंतेत सापडलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जुलै महिन्यातील दमदार पावसाने मोठा दिलासा दिला
Kharif Crops : जून महिन्यात पावसाने पाठ फिरवल्याने चिंतेत सापडलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जुलै महिन्यातील दमदार पावसाने मोठा दिलासा दिला आहे. पावसाच्या जोरदार पुनरागमनामुळे खरीप हंगामातील रखडलेल्या पेरण्यांनी वेग घेतला असून अहिल्यानगर जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल 5 लाख 14 हजार हेक्टर क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. हे क्षेत्र सरासरी पेरणीच्या सुमारे 70 टक्के असल्याने यंदाच्या खरीप हंगामाबाबत आशादायी चित्र निर्माण झाले आहे.
सोयाबीन, मका, कापूस आणि तूर पिकांना शेतकऱ्यांनी सर्वाधिक पसंती
जून महिन्यात अनेक भागांत पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली होती. अनेक ठिकाणी शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसले होते. सुरुवातीच्या टप्प्यात केवळ 20 टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या होत्या. मात्र जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून जिल्ह्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे शेतकऱ्यांनी शिवारात मोठ्या प्रमाणावर मशागत व पेरणीची कामे हाती घेतली. परिणामी काही दिवसांतच पेरणीचा टक्का झपाट्याने वाढला आहे. यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीन, मका, कापूस आणि तूर या पिकांना शेतकऱ्यांनी सर्वाधिक पसंती दिली आहे. जिल्ह्यातील बहुतांश भागात या पिकांची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली असून शिवार हिरवागार दिसू लागला आहे. सध्या उगवण झालेली पिके जोमदार अवस्थेत असून वाढही समाधानकारक असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या 97 टक्के पावसाची नोंद
सुरुवातीच्या पावसाअभावी दुबार पेरणीचे संकट निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र जुलै महिन्यात झालेल्या चांगल्या पावसामुळे हे संकट टळले असून सध्या तरी दुबार पेरणीची गरज भासलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा अतिरिक्त खर्च वाचला असून खरीप हंगामावरील विश्वास अधिक दृढ झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या 97 टक्के पावसाची नोंद झाली आहे. तरीही राहुरी, श्रीरामपूर आणि शेवगाव तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने या भागातील शेतकरी अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
ISRO मधील 120 शास्त्रज्ञांनी दिले राजीनामे, केंद्र सरकारचा हस्तक्षेप; प्रकरण काय? –
या तालुक्यांमध्ये आगामी काही दिवसांत चांगला पाऊस झाल्यास खरीप पिकांना अधिक बळ मिळणार आहे. निराशेनंतर जुलै महिन्यातील पावसाने जिल्ह्यातील खरीप हंगामाला नवसंजीवनी दिली आहे. शिवारात उगवलेल्या हिरव्यागार पिकांमुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा आशेचे हास्य फुलले असून यंदाच्या हंगामाकडून चांगल्या उत्पादनाच्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत.