Maharashtra Politics : राष्ट्रवादीत टाचणी पडताच चर्चेत येणारं ‘यशंवतराव चव्हाण सेंटर’ काय आहे?
मुंबई : सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात काम करणारे मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर (Yashwantrao Chavan center Mumbai) हे मागील दोन ते तीन महिन्यांपासून महाराष्ट्राच्या राजकारणाचे केंद्रबिंदू बनले आहे. मे महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर इथे झालेला राजकीय गोंधळ अवघ्या महाराष्ट्राने पाहिला होता. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 16 जुलैला राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांना घेऊन यशवंतराव चव्हाण सेंटर इथे शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर आज पुन्हा अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांसह शरद पवार यांची याच ठिकाणी भेट घेतली. (Know about Yashwantrao Chavan center Mumbai and ncp leaders relations)
त्यामुळे मागील काही दिवसांपासून मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर हे राज्याच्या राजकारणाचे केंद्रबिंदू बनले असून सर्वांचेच लक्ष या सेंटरकडे लागले आहे. त्या पार्श्वभूमीवर हे यशवंतराव चव्हाण सेंटर नेमकं आहे तरी काय? हे बघणं महत्वाच ठरतं.
संयुक्त महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण म्हणजे मराठी मनांचा मानबिंदू. संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, महाराष्ट्राच्या कृषी व औद्योगिक विकासाचा पाया घालणारे, महाराष्ट्रात सहकाराचे जाळे विणणारे, आणि पंचायत राज्याच्या माध्यमातून तळागाळातल्या समाजाला स्वत:कडे असणाऱ्या लोकशाही ताकदीचे भान देणारे द्रष्टे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. देशाच्या राजकारणामध्ये जेव्हा – जेव्हा कठीण परिस्थिती उद्भवली, तेव्हा – तेव्हा संबंधित खाती सक्षमपणे सांभाळून देशाच्या स्थैर्यात महत्त्वाची भूमिका बजावत यशवंतराव चव्हाण यांनी राष्ट्रीय राजकारणाला नवी दिशा दिली. 25 नोव्हेंबर 1984 रोजी त्यांचे निधन झाले.
यशवंतराव चव्हाण सेंटरची स्थापना :
यानंतर यशवंतराव चव्हाण यांचे अपूर्ण कार्य पूर्णत्वास नेण्यासाठी त्यांचे समर्थक, शिष्य आणि कार्यकर्ते एकत्र आले. त्यातूनच 17 सप्टेंबर 1985 रोजी मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानची स्थापना केली. हेच प्रतिष्ठान आज यशवंतराव चव्हाण सेंटर म्हणून ओळखले जाते. या सेंटरचे मागील अनेक वर्षांपासून शरद पवार अध्यक्ष आहेत. तर सुप्रिया सुळे या कार्याध्यक्षा आहेत. याशिवाय राष्ट्रवादीचे अरुण गुजराथी, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, राजेश टोपे असे नेते कार्यकारिणी मंडळावर आहेत.
Maharashtra Assembly Session : पहिल्याच दिवशी बच्चू कडूंची हवा: मंत्रिपदाचा शब्द अन् CM शिंदेंसोबत रॉयल एन्ट्री
याशिवाय शरद पवार यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ साहित्यिक आणि माजी आमदार ना. धों. महानोर, लक्ष्मण माने हे देखील कार्यकारिणीवर आहेत. सोबतच राजेंद्र शिंगणे, चंद्रकांत नवघरे, शेखर निकम, बाळासाहेब पाटील, विनायक पाटील, चंद्रकांत घुले पाटील असे राष्ट्रवादीचे बरेच आजी-माजी आमदार सेंटरचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. या नावांवर नजर टाकल्यास यशवंतराव चव्हाण सेंटरवरती राष्ट्रवादीच्या नेत्यांचा मोठ्या प्रमाणात पगडा असल्याचं दिसून येत. त्यामुळेच राष्ट्रवादीचे बहुतांश कार्यक्रम, अनेक बैठका याठिकाणी पार पडतात.
Praveen Darekar यांचं मंत्रिपदासाठी वेटींग; पण विरोधकांचे ‘त्या’ जखमेवरच मीठ
यशवंतराव चव्हाण सेंटरची भूमिका आणि कार्यक्षेत्र :
वेबसाईटवरील माहितीनुसार, यशवंतराव चव्हाण सेंटर हे धर्मनिरपेक्ष, पक्षनिरपेक्ष व्यासपीठ आहे. महाराष्ट्राच्या जनमानसाला सचिंत करणार्या प्रश्नांचा खल करावा आणि या चर्चेतून कार्य करणारी माणसे तयार व्हावीत, हीच सेंटरची भूमिका आहे. यशवंतराव चव्हाण सेंटर शिक्षण, आरोग्य, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि युवा अशा विविध क्षेत्रांमध्ये काम करते. या सेंटरकडून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, पुरस्कारही दिले जातात. फिल्म फेस्टिवल्सही भरवले जातात. याशिवाय शरद पवार यांच्या नावाने फेलोशिपही दिली जाते.