Kokan Election : म्हात्रेंचा विजय करणार भाजपची पाळेमुळे घट्ट!

Kokan Election : म्हात्रेंचा विजय करणार भाजपची पाळेमुळे घट्ट!

अलिबाग : कोकण शिक्षक मतदार संघात ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या विजयाने कोकणात भाजपची (BJP) पाळेमुळे अधिक घट्ट होत असल्याचे दिसून येत आहे. शेतकरी कामगार पक्षाचे बाळाराम पाटील (Balaram Patil) यांचा म्हात्रे यांनी बहुमताने पराभव केला. राजकारणातला दीर्घ अनुभव, महाविकास आघाडीच्या (MVA) सर्व नेत्याचे पाठबळ असतानाही ते पराभव रोखू शकले नाहीत. ज्ञानेश्वर म्हात्रे यांना पहिल्या पसंतीची १८ हजारांपेक्षा जास्त मतं मिळाली. तेव्हापासून ज्ञानेश्वर म्हात्रे (Dnyaneshwar Mhatre) यांच्याकडे तब्बल ६ हजार मतांची आघाडी होती शेवटपर्यंत आघाडी कायम ठेवत त्यांनी विजयावर शिक्कामोर्तब केले.

ज्ञानेश्वर म्हात्रे यांना २०,८०० मते मिळाली असून शेकापच्या पाटील यांना ९,५०० मतेच मिळाली आहेत. त्यामुळे ११,३०० मते जास्त पटकावून म्हात्रेंनी आपला विजय नोंदवला. मागील निवडणुकीत बाळाराम पाटील यांना पडलेल्या मतांमध्ये फारसा फरक पडला नाही, तर ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी ४ हजार मतांवरुन थेट २१ हजार मतांपर्यंत झेप घेतली.

गुजरात ते गोवा राज्यापर्यंतच्या कोकण किनारपट्टीतील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग या जिल्ह्यांचा समावेश कोकण शिक्षक मतदार संघात होतो. भाजपने ज्ञानेश्वर म्हात्रे यांना पाठबळ देत ही निवडणुक प्रतिष्ठेची केली होती. प्रत्येक शिक्षक मतदारापर्यंत पोहचण्यात भाजपाचे नेते यशस्वी झाल्याने हा विजय साकारता आला असून हा विजय शिक्षकांचा असल्याची भावना ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी मतमोजनीनंतर व्यक्त केली.

कोकण शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीसाठी रायगड जिल्ह्यातील २७ मतदान केंद्रावर निवडणूक प्रक्रिया पार पडली. यासाठी एकूण १०,१०१ मतदार मतदानास पात्र होते. त्यामध्ये ४,३५५ पुरुष तर ५,७४६ महिला मतदारांचा समावेश होता. त्यामधून एकूण ९,४५० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. जिल्ह्यात एकूण सरासरी ९३.५६ टक्के मतदान झाले. ही राज्यातील सर्वाधिक सरासरी आहे. आजच्या मतमोजणीकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले होते.

या निवडणुकीत शेकापचे बाळाराम पाटील, भाजपचे ज्ञानेश्‍वर म्हात्रे यांच्यासह अन्य आठजण रिंगणात आहेत. मतदानानंतर सर्व मतपेट्या पोलिस बंदोबस्तासह आगरी कोळी संस्कृती भवन सेक्टर २४ पामबीच रोड नेरुळ नवी मुंबई येथे स्ट्राँग रुममध्ये जमा करण्यात आल्या होत्या. त्याच ठिकाणी सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली होती.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube