Raigad : तब्बल 10 कोटींची फसवणूक, महिन्यात पैसे डबल करण्याचे दिले होते आमिष
रायगड ( Raigad ) जिल्ह्यातील उरण तालुक्यामध्ये ( Uran ) चिट्स फंड मध्ये गुंतवणूक केली तर महिन्यात दुप्पट करून मिळतील, अशा प्रकारची स्किम गेल्या काही महिन्यांपासून सुरू होती. या स्कीम मध्ये लोकांनी मोठ्या प्रमाणावर पैसे गुंतवले होते. पण या स्कीम सुरु करणाऱ्यांनी लोकांना फसवले आहे. त्यामुळे या स्कीम मध्ये ज्यांना पैसे मिळाले नसतील त्यांनी तक्रार दाखल करावी, अशा प्रकारचे आवाहन पोलिसांनी करूनही कोणी पुढे येत नव्हते. अखेर पोलीस आयुक्त मिलींद भारंबे यांनी विशेष पोलीस स्कॅाड तयार करत तपासाचे आदेश दिले आहेत.
उरण तालुक्यातील कोप्रोली गावात इको गाडी मधून चिट्स फंडचे पैसे येणार असल्याची गुप्त माहिती पोलीसांना मिळाली होती. यावरून कोप्रोली गावात पोलिसांनी सापळा रचला होता. यानंतर पोलिसांना इको गाडी मधून ट्रॅव्हल्स बॅग मिळाल्या. या बॅगा मध्ये १० कोटी रूपायांची रोख रक्कम असल्याचे समोर आले आहे.
यावेळी गाडीत असलेल्या सतीश गावंड आणि शशिकांत गावंड यांच्याकडे पैशाबाबत चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पैसे कुठून आणले याचा योग्य स्त्रोत न सांगितल्याने पोलीसांनी पैसै ताब्यात घेत दोन आरोपींना अटक केली. प्राईज चिट्स ॲन्ड मनी सरक्युलेशन स्किम कंपणीच्या नावाने आरोपी लोकांकडून लाखो रूपये घेत होते. महिन्यात पैसे दुप्पट करण्याचे आमीष देत आरोपींनी करोडो रूपये गोळा केले असल्याचे चौकशीत समोर आलेय. ज्या लोकांची फसवणूक झालेय त्यांनी समोर येवून तक्रार दाखल करावी असे आवाहन आता नवी मुंबई पोलीसांनी केलेय. यासंदर्भात पोलिस उपायुक्त पंकज डहाणे यांनी माहिती दिली आहे. सध्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.