Aditya Thackeray : ठाकरेंचं मिशन कोकण! ‘खळा’ बैठकांतून साधणार निवडणुकांचे लक्ष्य?

Aditya Thackeray : ठाकरेंचं मिशन कोकण! ‘खळा’ बैठकांतून साधणार निवडणुकांचे लक्ष्य?

Aditya Thackeray : लोकसभा आणि विधानसभा निवडणुका (Elections 2024) तोंडावर आलेल्या असतानाच ठाकरे गटाने कोकणावर लक्ष केंद्रीत केले आहे. ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आजपासून दोन दिवसांच्या कोकण दौऱ्यावर आहेत. येथे ते पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. तसेच खळा बैठका घेणार आहेत. त्यांच्या या दौऱ्याच्या निमित्ताने कोकणातील राजकारण चांगलंच ढवळून निघणार आहे. या दौऱ्यात आदित्य ठाकरे रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यात बैठका घेणार आहेत. आजपासून दोन दिवस ठाकरे सिंधुदर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग ते रायगड जिल्ह्यातील नागोठणे या दरम्यान दौरा करणार आहेत. याचवेळी ते खळा बैठकीत सहभागी होऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या दृष्टीने हा दौरा असला तरी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीनेही दौरा महत्वाचा मानला जात आहे.

लुटमार, गद्दारीचे दिवस जाणार अन् पुन्हा.. Aaditya Thackeray यांचा राज्य सरकारवर निशाणा

राज्यातील सध्याच्या घडामोडी, शिवसेनेतील फाटाफूट, कोकण पदवीधर निवणडणूक, लोकसभा त्यापाठोपाठ विधानसभा निवडणुका या सगळ्या घडामोडींच्या दृष्टीने आदित्य ठाकरेंचा हा दौरा महत्वाचा मानला जात आहे. त्यांच्या या दौऱ्याची जय्यत तयारी केली आहे. ठाकरे काल रात्रीच कोकणाकडे रवाना झाले असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग येथून त्यांच्या दौऱ्याला सुरुवात होणार आहे. विशेष म्हणजे, या दौऱ्यात जाहीर सभा होणार नाही. खळा बैठकांच्या माध्यमातूनच आदित्य ठाकरे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे या बैठकीत आदित्य ठाकरे काय कानमंत्र आपल्या कार्यकर्त्यांना देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

खळा बैठक म्हणजे काय ? 

जसे उर्वरित महाराष्ट्रात घोंगडी बैठका नेहमीच चर्चेचा विषय असतो तशाच बैठका कोकणात खळा बैठका या नावाने ओळखल्या जातात. घरासमोर अंगण असते त्या अंगणालाच कोकणात खळा म्हणतात. गावातील, घरातील किंवा वाडीतील कोणताही निर्णय असला तरी तो अंगणातच म्हणजेच खळ्यात बसून एकमुखाने घेतला जातो. यामध्ये प्रत्येकाचं मत विचारात घेऊन निर्णय घेतला जातो. आदित्य ठाकरे खळा बैठक घेणार असल्याने कोकणात अनेक ठिकाणी घरासमोरील अंगण शेणाने सारवून आणि रांगोळी काढून सुशोभित करण्यात आले आहे. त्यांच्या या खळा बैठकांची जोरदार चर्चा कोकणात सध्या सुरू आहे.

रस्त्यांची साडेआठ हजार कोटींची कामं रखडली, NOC न देण्यासाठी वाहतूक पोलिसांवर दबाव, आदित्य ठाकरेंचे आरोप

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube