Lok Sabha Election : महाराष्ट्राची वाट खडतर! फाटाफुटीने अवघड केला निवडणुकीचा पेपर
Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकांची घोषणा झाली आहे. महाराष्ट्रात पाच टप्प्यात (Maharashtra Politics) मतदान होणार आहे. मागील निवडणुकीच्या तुलनेत यावेळची लोकसभा निवडणूक चुरशीची होणार आहे. त्यामुळे राजकारणालाही वेगळीच धार चढली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याने निवडणुकीत अधिकच रंगत आली आहे. २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना युतीने ४१ जागांवर विजय मिळवला होता. यामध्ये भाजप २३ आणि शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने चार जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसला फक्त एका जागेवर समाधान मानावे लागले होते.
पुढे महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका झाल्या. या निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदाच्या मुद्द्यावर भाजप आणि शिवसेना यांची युती तुटली. भाजप आणि शिवसेना वेगळे झाले. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं. सरकार सत्तेत असतानाच एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केलं. त्यामुळे मविआ सरकार कोसळून राज्यात शिंदे आणि भाजप सरकार आलं. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचा निर्णय निवडणूक आयोगाने दिला.
लेट्सअप विश्लेषण : ‘कमळा’ला का पडली ‘इंजिना’ची गरज; ही आहेत ‘हायलाईटेड’ 5 कारणं
थोड्याच दिवसानंतर शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा अजित पवार यांनी बंडाचे निशाण फडकावले. आता अजित पवार भाजपबरोबर सत्तेत आहेत. हा इतिहास सर्वांनाच माहिती आहे. परंतु, या राजकारणाचा परिणाम यावेळच्या लोकसभा निवडणुकांवर होण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.
कोकण, पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी-शिवसेना मजबूत दावेदार
राज्यातील सध्याच्या राजकीय स्थितीचा आढावा घेतला तर कोकण भागात सहा लोकसभा मतदारसंघ येतात. यामध्ये देशाची आर्थिक राजधानी मुंबई सुद्धा आहे. या भागात वाहतूक आणि दळणवळण आणि रोजगार या प्रमुख समस्या आहेत. राज्यातील सर्वात विकसित क्षेत्रात पश्चिम महाराष्ट्राचा समावेश होतो. या भागात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना मजबूत दावेदार आहेत. परंतु दोन्ही पक्षात फूट पडल्याने येथील समीकरणे आगामी निवडणुकीत बदलू शकतात. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने येथे पाच जागा जिंकल्या होत्या. तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने प्रत्येकी तीन जागा जिंकल्या होत्या.
उत्तर महाराष्ट्रात फक्त महायुतीच
उत्तर महाराष्ट्रात कांदा आणि द्राक्षांचे उत्पादन मोठ्या प्रमाणत होते. २०१९ च्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेने येथील सर्व सहा जागा जिंकल्या होत्या. आताही परिस्थिती फारशी बदललेली नाही. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आता शरद पवार गटात आहेत. भाजपने रावेर मतदारसंघात पुन्हा रक्षा खडसे यांनाच उमेदवारी दिली आहे. दुसरीकडे त्यांच्याविरोधात एकनाथ खडसे किंवा रोहिणी खडसे निवडणूक लढणार नाहीत हे देखील स्पष्ट झाले आहे. या भागातील नगर, शिर्डी, धुळे, नंदूरबार आणि नाशिक या मतदारसंघात महायुतीचे खासदार आहेत.
ठरलं, ठाकरेंची शिवसेना 22 जागा लढवणार! शिलेदारांची नावेही आली समोर
मराठवाड्यात टफ फाईट
मराठवाडा आणि दुष्काळ हे समीकरण आजही कायम आहे. या भागात पाऊस कमी होत असल्याने राज्यातील अन्य भागांच्या तुलनेत मराठवाड्यातील जिल्ह्यांत विकास कमी झाला आहे. आता याच भागात मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी मोठे आंदोलन उभे केले होते. पुढे त्यांचे आंदोलन राज्यभरात पोहचले. येथील धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, परभणी, बीड, लातूर, हिंगोली या मतदारसंघातील समीकरणे फाटाफुटीने अधिक कठीण झाली आहेत. धाराशिव मतदारसंघ ठाकरे गटाने चांगला बांधून ठेवला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये वादावादीने आव्हान वाढले आहे. अशोक चव्हाण यांच्या भाजपप्रवेशाने नांदेडातील समीकरणे बदलली आहेत. जालना, बीड येथील परिस्थिती महायुतीला अनुकूल आहे.
विदर्भाचा पेपर अवघड
विदर्भात शेतकरी आत्महत्यांची परिस्थिती गंभीर आहे. गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादाची समस्या आहे. चंद्रपूर जिल्ह्यात मानव वन्यप्राण्यांचा संघर्ष पाहायला मिळतो. मागील निवडणुकीत विदर्भातील ११ जागांपैकी भाजप पाच आणि शिवसेनेने तीन जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेस आणि अपक्ष एक-एक जागेवर विजयी झाले होते.