निवडणुकीत नेमकं कुठं चुकलं, भाजप-काँग्रेसचं साटंलोटं काय? बच्चू कडूंनी सांगितली खरी गोष्ट..

Bacchu Kadu on Maharashtra Assembly Election Results : यंदाच्या विधानसभा निवडणुकीत अनेक दिग्गजांना थेट घरी बसावं लागलं. यात अमरावती जिल्ह्यातील अचलपूर मतदारसंघ चांगलाच चर्चेत राहिला. या मतदारसंघात दिग्गज नेते आणि माजी मंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu) यांना पराभवाचा धक्का बसला. कुणालाही अपेक्षित नव्हता असा निकाल या मतदारसंघात लागला. या पराभवाची राज्यात चर्चा झाली. परंतु, बच्चू कडूंसारख्या लढवय्या नेत्याला मतदारांनी का नाकारलं? बच्चू कडूंचं कुठं काही चुकलं का? या प्रश्नांची उत्तरं आता मिळाली आहेत. स्वतः बच्चू कडूंनीच लेट्सअप मराठीला दिलेल्या मुलाखतीत याचा खुलासा केला आहे. निवडणुकीच्या काळातलं बटेंगे तो कटेंगेचं चित्र आणि मतदारसंघाकडे झालेलं दुर्लक्ष यामुळे निवडणुकीवर परिणाम झाला असं बच्चू कडू यांनी सांगितले.
विधानसभा निवडणुकीत तुम्ही तुमच्या मतदारसंघाचं काय विश्लेषण केलं असं विचारलं असता, बटेंगे तो कटेंगे नाहीतर फतवा. जय किसान जय भारत म्हणणाऱ्यांचं देशात काय शिल्लक राहिलं आहे. ईव्हीएम मशीन जिंदाबाद आहेच असा उल्लेख त्यांनी केला. नवनीत राणांनी त्यांचं म्हणणं खरं करून दाखवलं असं म्हणता येईल का? या प्रश्नावर उत्तर देताना बच्चू कडू म्हणाले, त्यांचा यात काहीच विषय नव्हता. सध्या जे काही चित्र बदललं आहे ते काय फक्त अचलपूरचंच बदललं आहे का? राज्यात नाही तर देशातच चित्र बदललं होतं. मग त्याचं श्रेय नवनीत राणालाच द्यायचं का.
Bacchu Kadu Exclusive : तेव्हा सांगितलं असतं तर, फडणवीस तोंडावर पडले असते…
तुम्ही निवडणुकीच्या आधी राज्यभर फिरले हेच तुमच्यासाठी चूक ठरलं का? या प्रश्नाचं मात्र कडूंनी स्पष्ट उत्तर दिलं. ते म्हणाले, तसंही होऊ शकतं. चुका अनेक होऊ शकतात. पण बटेंगे तो कटेंगे हा जो काही मूलमंत्र दिलेला होता त्याचा परिणाम झाला असावा. तसेच बच्चू कडूला संपवण्यासाठी माझ्याविरोधात भाजप, काँग्रेस सगळे एकत्र येऊन काम करतात. माझ्याविरोधात विधानसभेत तेच झालं. भाजपनं काँग्रेसला चालवलं आणि भाजपलाही चालवलं. बच्चू कडूला कसा अडथळा निर्माण करता येईल याचे प्रयत्न केले. ह्यांचं हे प्लॅनिंग गेल्या वीस वर्षांपासून सुरू आहे असा दावा कडू यांनी केला.
अचलपूरकडे माझं दुर्लक्ष झालं
मी महाराष्ट्रात फिरत राहिलो आणि शेवटच्या एकच दिवशी अचलपूरला गेलो होतो. माझ्या मतदारसंघात मी फक्त एकच दिवस प्रचार केला. त्याचा परिणाम या निवडणुकीत झाला. मला मतदारसंघात पाहिजे तितकं लक्ष देता आलं नाही. आता मात्र मतदारसंघातले काही लोकं पश्चात्ताप करतात. चांगला माणूस पाडला याचा पावलोपावली विचार होतोय. याला मी आता जास्त महत्व देत नाही. कारण लोक काय म्हणतात हा वेगळा भाग आहे आणि मी काय म्हणतो हाही एक वेगळा भाग आहे.
हिंदी भाषेच्या वादावर कडू काय म्हणाले
तुम्ही शिक्षण राज्यमंत्री होतात. आता सध्या हिंदी भाषेवरुन वाद सुरू आहे. त्यावेळी खरोखरच तुमच्या खात्याने माशेलकर समितीचा अहवाल स्वीकारला होता का? पहिलीपासून हिंदी सक्तीचा निर्णय तुम्ही राज्यमंत्री असताना झाला होता का? यावर बोलताना बच्चू कडू म्हणाले, काय होतं की राज्यमंत्र्याकडे सगळ्याच फाइल येत नाही. काय निर्णय होतात हे राज्यमंत्र्यांनाही बऱ्याचदा माहिती नसतं. ही वस्तुस्थिती आहे. कॅबिनेटमध्ये बसण्याचा अधिकार सुद्धा राज्यमंत्र्याला नाही. ह्यांच्यापेक्षा आमदार तरी बरा. आमदाराला किमान विधानसभेत बोलता तरी येतं. मी त्या काळात भांडून भांडून काही निर्णय करुन घेतले होते. पण राज्यमंत्र्यांच्या निर्णयाला कॅबिनेट मंत्र्यांनी स्टे दिला होता.
छाती ठोकून सांगतो, होय…गुवाहाटीला गेलो; बच्चू कडूंनी केला खळबळजनक खुलासा