वाढत्या थंडीचा पशुपालक शेतकऱ्यांना फटका, लम्पीनं ग्रासलेल्या जनावरांना विविध रोगांची लागण
मुंबई : राज्याच्या विविध भागात आठवडाभर ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसानंतर आता तापमानात मोठी घट झालीय. त्यानंतर लम्पीमुळं आधीच हैराण झालेल्या जनावरांना आता कडाक्याच्या थंडीनं विविध आजारांची लागण झाल्याचं पाहायला मिळतंय. जनावरांमध्ये तोंडखुरी आणि पायखुरी असे विषानूजन्य आजार होत आहेत. लम्पीसोबतच इतर आजारांना ही जनावरं बळी पडताना दिसताहेत. त्यामुळं पशुपालक शेतकऱ्यांच्या अडचणीत मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय. थंडीमुळं शेतातील पालेभाज्यांचं मोठं नुकसानन झालंय.
वातावरणात होणाऱ्या बदलामुळं जनावरांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होत आहे. राज्यात थंडीचा कडाका चांगलाच जाणवत आहे. अतिथंडीमुळं जनावरांना विविध आजार जडत असल्याचं दिसून येतंय.
बुलढाण्यात लम्पीनं ग्रासलेल्या जनावरांना इतरही आजारांची लागण होत असल्याचं पाहायला मिळतंय. गत आठवड्यात ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसानं तापमानात मोठी घट झाली. या थंडीनं जनावरांना मोठा फटका बसला आहे. थंडीचा जोर वाढल्यानं लम्पी आजारानं ग्रासलेल्या जनावरांना आता विविध आजारांची लागण होत असल्याचं समोर आलंय.
जनावरांना फूट अॅण्ड माऊथ डिसीज म्हणजेच तोंडखुरी आणि पायखुरी असे विषाणूजण्य आजार होत असल्याचं दिसत आहे. लम्पीबरोबर इतर आजार जनावरांना जडत असल्यानं पशुपालक शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
भंडारा जिल्ह्यातही वाढत्या थंडीमुळं शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. थंडीमुळं पालेभाज्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचं दिसून आलंय. थंडीमुळं पेरणी झालेल्या पिकांची वाढ खुंटल्याचं दिसून येतंय. त्यामुळं शेतकऱ्यांना दुबार पेरणीच्या संकटाला सामोरं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भंडाऱ्यात वाढलेल्या थंडीमुळं फुलकोबीसारख्या भाज्यांची पानं पिवळी पडू लागली आहेत. इतरही भाज्यांची तशीच स्थिती असल्यामुळं मुदतीच्या आधीच पिकं काढली जाताहेत. त्यामुळं भाज्यांना योग्य किंमत मिळत नाही अन् त्याकडं ग्राहकवर्ग पाठ फिरवत असल्याचंही दिसून येतंय. सततच्या वातावरण बदलामुळं हरभरा पिकावर मर रोगाची लागण झाली होती. आता घाटे आळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळं शेतकऱ्यांच्या चिंतेत मोठी भर पडली आहे.