महादेव जानकार थेट मिर्झापूरमधून उतरणार लोकसभेच्या मैदानात; PM मोदींच्या मंत्र्याला देणार आव्हान!
प्रफुल्ल साळुंखे (विशेष प्रतिनिधी) :
मुंबई : “मी माझ्या पक्षाची ताकद वाढविणार आहे. ज्यावेळी माझी ताकद वाढेल त्यावेळी ते निश्चित माझ्याबरोबर येतील. तोपर्यंत मी काही त्यांनी मस्का लावणार नाही. सध्या मी परभणी, बारामती, माढा आणि मिर्झापूर या 4 लोकसभा मतदारसंघांतून तयारी करत आहे. उत्तर प्रदेशमधील मिर्झापूर मतदारसंघातून माझं तिकीट जवळपास फायनल झालं आहे. महाराष्ट्रातून परभणी की माढा कुठून लढायचं हे अद्याप निश्चित झालेले नाही, असं म्हणत राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर (Mahadeo Jankar) यांनी एकच खळबळ उडवून दिली आहे. ते लेट्सअप मराठीला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये बोलत होते. (RSP Leader Mahadev Jankar will contest the Lok Sabha elections from Mirzapur)
लेट्सअप मराठीने घेतलेल्या विशेष मुलाखतीत जानकर यांनी विविध मुद्द्यांवर मते व्यक्त केली. पक्षाची आगामी वाटचाल कशी असेल यावरही भाष्य केले. तसेच भाजपाच्या राजकारणावरही जोरदार टीका केली. ते पुढे म्हणाले, ‘कोणत्याही मोठ्या पक्षावर नाराज न राहता आपली झोपडी मोठी करण्यासाठी आपण काय ताकद लावली पाहिजे यावर आपण काम केले पाहिजे. राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार, खासदार ज्यावेळी जास्त होतील त्यावेळी हे मोठे पक्ष आपल्याला दाबणार नाही तर सोबत घेतील.
संग्राम जगताप अजितदादांकडे जाताच अभिषेक कळमकर शरद पवारांकडे
आता भाजपची सध्याची भूमिका छोट्या पक्षांना दाबण्याची आहे. त्यांनी आम्हाला दिल्लीला बैठकीला बोलावले नाही म्हणून काही फरक पडत नाही. आमच्या ताकदीच्या चिकाटीच्या जोरावर पक्ष देशपातळीवर कसा जाईल याची शपथ घेऊन आम्ही 30 वर्षांपूर्वी घराबाहेर पडलो होतो. मी माझ्या बळावर नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य निवडून आणले आहेत. त्यामुळे मला त्यांनी बैठकीला बोलावले काय किंवा नाही बोलावले तरी मला त्याची काही फिकीर नाही, असही जानकर म्हणाले.
महादेव जानकरांनी आपले उमेदवार भाजपाच्या चिन्हावर लढवले म्हणून जानकरांची ताकद आज विधानसभेत दिसत नाही असा प्रश्न विचारला असता जानकर म्हणाले, असे बिलकुल नाही. आजही माझे दोन आमदार हे रासपाच्या चिन्हावर निवडून आलेले आहेत. मी आज विधानपरिषदेत आहे तो माझ्या पक्षाच्या चिन्हावर आहे. भाजपच्या चिन्हावर लढलो नाही. राहुल कुलही आमच्याच पक्षात आमदार होते, त्यांनी ऐनवेळी एबी फॉर्म जोडला म्हणून ते भाजपाचे झाले. आता आमचे दोन आमदार आहेत. त्यांच्या पक्ष चिन्हावर लढण्याचा काहीच प्रश्न येत नाही.
एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रिपद जाणार? मंत्री रावसाहेब दानवेंनी स्पष्टच सांगितलं…
‘मोठे पक्ष नेहमीच दाबण्याचा प्रयत्न करत असतात. मग छोट्या पक्षांनी आपल्या औकातीत राहिलं पाहिजे. त्यांनी आपली औकात वाढविली पाहिजे. त्यांच्यावर अवलंबून राहायचं नाही. मी ही त्यांच्यावर अवलंबून नाही. 2024 पर्यंत माझी आमदारकी आहे. त्याआधीच मी राष्ट्रीय समाज पक्षाच्या तिकीटावर दिल्लीत खासदार म्हणून जाईन’, असा विश्वास जानकर यांनी व्यक्त केला.
केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल आहेत विद्यमान खासदार :
मिर्झापूर जिल्ह्यातील मिर्झापूर लोकसभा हा एक मतदारसंघ आहे. यात पाच विधानसभा क्षेत्र आहे. हा मतदार संघ अतिमागास असून गटातटातील युद्धासाठी कुप्रसिद्ध आहे. कोणत्याच पक्षाचा बालेकिल्ला नसलेल्या या मतदारसंघातून कधी काँग्रेसचा, कधी भाजपचा, कधी समाजवादी पक्षाचा तर कधी बहुजन समाज पक्षाचा उमेदवार निवडून आला आहे. सध्या अपना दलमधून केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल या इथल्या खासदार आहेत. आता याच मतदारसंघातून महादेव जानकर मैदानात उतरणार आहेत.
या मतदारसंघात मागील लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षाने निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांचे उमेदवार दिनेश कुमार पाल यांना 7 हजार मत मिळाली होती.
जानकर दिलेल्या माहितीनुसार ते या मतदार संघात मागील पाच वर्षापासून सतत संपर्कात आहे. केवळ संपर्क नाही तर अनेकदा या मतदारसंघात त्यांनी स्वतः भेटी दिल्या आहेत. या मतदारसंघात मला व्यक्तिशः मानणारा मोठा वर्ग आहे. या सर्व बाबी पाहता आपण स्वतः या लोकसभा मतदार संघ लढवण्यासाठी इच्छूक असल्याचे जानकर यांनी सांगितलं.