‘अजितदादा मुख्यमंत्री झालेच तर सरकारचं’.. बच्चू कडूंच्या विधानाने नवा वाद?
Bacchu Kadu on Ajit Pawar : मागील महिन्यात राष्ट्रवादीत बंडखोरी करत अजित पवार(Ajit Pawar) यांच्यासह काही आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला. त्यानंतर अजित पवार मुख्यमंत्री होतील अशा चर्चा सातत्याने सुरू आहेत. अशातच प्रहारचे आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी खळबळजनक वक्तव्य केले आहे. अजित पवार मुख्यमंत्री झाले तर सरकारचं वाटोळं होईल, असे कडू म्हणाले.
कडू यांनी काल गोंदियात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, शरद पवार भाजपबरोबर गेले तर अजित पवार मुख्यमंत्री होऊ शकतात. अजित पवार मुख्यमंत्री झाले तर सरकारचं मोठं वाटोळं होईल. पण, एकनाथ शिंदेंच्या कामात कुणी आडवं येऊ नये असा इशारा कडू यांनी दिला. शासन आपल्या दारी म्हणजे जनतेच्या नावाने सुरू केलेला नवीन जुमला आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली होती. याबाबत विचारले असता कडू म्हणाले, कधी न केल्याने सुप्रिया सुळेंन जुमला वाटत आहे.
‘इतकं क्रूर सरकार अन् राजकारण आम्ही पाहिलं नाही’; मणिपूरवरून राऊतांची पुन्हा आगपाखड
शरद पवार यांना भाजपसोबत आणा तरच मुख्यमंत्री करू, अशी अट पंतप्रधान मोदी यांनी अजित पवार यांच्यासमोर ठेवल्याचा गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी नुकताच केला होता. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजारी असल्याचे कारण पुढे करत अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्याचाही प्रयत्न भाजपचा आहे, असेही वडेट्टीवार म्हणाले होते. त्यामुळे राज्यात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा जोरात सुरू झाल्या आहेत.
अजित पवार मुख्यमंत्री होतील अशीच चर्चा सध्या सुरू आहे. त्यात आता बच्चू कडू यांनी वेगळेच वक्तव्य केले आहेत. तिन्ही पक्षांचे सरकार व्यवस्थित चालले असल्याचे लोकांना पटवून देण्यात सत्ताधाऱ्यांची कसरत सुरू असतानाच कडू यांचे वक्तव्य आले आहे. त्यामुळे सरकारची अडचण होणार हे मात्र निश्चित आहे. यानंतर आता राजकीय वर्तुळातून काय प्रतिक्रिया येतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.