शिंदेंची खेळी यशस्वी? अजितदादांकडं तिजोरीच्या चाव्या पण, खर्च शिंदेच करणार
Maharashtra Cabinet : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर काल हिवाळी अधिवेशन संपताच खातेवाटप जाहीर करण्यात आले. या खातेवाटपात पुन्हा एकदा भाजपाचाच वरचष्मा दिसला. अनेक दिग्गजांना धक्का बसला तर काही नवख्या मंत्र्यांना वजनदार खाती देण्यात आली. भाजपाचाच विचार केला तर राधाकृ्ष्ण विखे पाटील, पंकजा मुंडे, गिरीश महाजन यांना मोठा धक्का बसला आहे. एकप्रकारे या नेत्यांचं राजकीय वजन कमी करण्याचाच प्रयत्न या माध्यमातून झाल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. तर आता एकनाथ शिंदे यांच्या राजकीय खेळीचीही चर्चा सुरू झाली आहे. राज्याच्या तिजोरीच्या चाव्या जरी अजितदादांच्या हाती असल्या तरी खर्चाचे अधिकार मात्र शिंदेनाच राहणार आहेत असं चित्र आता उभं राहू लागलं आहे.
विखे, मुंडे, महाजनांना धक्का, अजितदादांचा शब्दही खरा ठरला; खातेवाटपात नवं गणित
मंत्रिमंडळ विस्तारानंतर शनिवारी सायंकाळी खातेवाटप जाहीर करण्यात आलं. एकनाथ शिंदे यांच्या आमदारांना वजनदार खाती मिळाल्याचं दिसत आहे. एकनाथ शिंदे यांनी गृह खात्याचा आग्रह सोडून दिल्यानंतरच्या वाटाघाटीत बाजी मारल्याचं दिसून येत आहे. सध्याच्या परिस्थितीत शिंदे गट फडणवीसांच्या मंत्रिमंडळात दुसऱ्या क्रमांकावर राहिला आहे.
याचं कारण म्हणजे अनेक महत्वाची खाती आपल्याकडे घेण्यात शिंदे यशस्वी ठरले आहेत. नगरविकास, गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम तसेच एमएमआरडी, सिडको, एमएसआरडीचा ताबा शिंदे गटाकडेच राहणार आहे. इतकेच नाही तर राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांचा निधीही एकनाथ शिंदे यांच्याच हाती राहणार आहे. अर्थमंत्री म्हणून राज्याच्या तिजोरीच्या चाव्या जरी अजित पवार यांच्याकडे राहणार असल्या तरी खर्चाचे अधिकार एकनाथ शिंदे यांच्याकडे राहणार आहेत.
गृह नाही पण गृहनिर्माण मिळवलंच
खातेवाटपावेळी एकनाथ शिंदेंनी गृहखात्यासाठी जोर लावला होता. मुख्यमंत्रिपद मिळालं नाही तर किमान गृह विभाग तरी मिळावा असा शिंदेंचा आग्रह होता. यासाठी शिंदेंकडून फडणवीस उपमुख्यमंत्री असताना गृह खातं त्यांच्याकडे होतं असा तर्क दिला जात होता. मात्र भाजपने कोणत्याही परिस्थितीत गृह विभाग सोडण्यास नकार दिला. गृह खातं मिळणार नाही म्हटल्यावर एकनाथ शिंदेंनीही दबावतंत्राचा वापर करत गृहनिर्माण सारखं वजनदार खातं पदरात पाडून घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
फडणवीसांच्या मंत्रिमंडळात नवखे मंत्री आणि वजनदार खातेही; दिग्गजांना मोठा झटका
शिंदे गटाचे ९ आमदार कॅबिनेट मिनिस्टर
मंत्रिमंडळात शिवसेनेला किती मंत्रीपदं मिळाली याचा विचार केला तर शिंदे गटाकडून ११ आमदारांनी मागील आठवड्यात मंत्रिपदाची शपथ घेतली होती. आता खातेवाटपात यातील नऊ आमदारांना कॅबिनेट तर दोघा जणांना राज्यमंत्रिपद मिळालं आहे. उदय सामंत आणि गुलाबराव पाटील यांना त्यांची जुनीच खाती मिळाली आहे. उदय सामंत यांना उद्योग तर गुलाबराव पाटील यांना पाणीपुरवठा विभाग मिळाला आहे.
दादा भुसे यांना यांना शालेय शिक्षण, प्रकाश आबिटकर यांना सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण, भरत गोगावले यांनी रोजगार हमी फलोत्पादन, संजय राठोड यांनी मृद व जलसंधारणस, शंभूराज देसाई यांना पर्यटन आणि माजी सैनिक कल्याण तर संजय शिरसाट यांना सामाजिक न्याय मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे.
जैस्वाल आणि कदम राज्यमंत्री
आमदार आशिष जैस्वाल यांना वित्त नियोजन, कृषी, मदत आणि पुनर्वसन, कायदा आणि न्यायव्यवस्था, कामगार विभागाचं राज्यमंत्रिपद दिलं आहे. तर योगेश कदम यांना गृह (शहरी), महसूल, ग्रामीण विकास आणि पंचायती राज, अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण या खात्यांचे राज्यमंत्री करण्यात आले आहे.