विखे, मुंडे, महाजनांना धक्का, अजितदादांचा शब्दही खरा ठरला; खातेवाटपात नवं गणित

विखे, मुंडे, महाजनांना धक्का, अजितदादांचा शब्दही खरा ठरला; खातेवाटपात नवं गणित

Maharashtra Cabinet : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर काल हिवाळी अधिवेशन संपताच खातेवाटप जाहीर करण्यात आले. या खातेवाटपात पुन्हा एकदा भाजपाचाच वरचष्मा दिसला. अनेक दिग्गजांना धक्का बसला तर काही नवख्या मंत्र्यांना वजनदार खाती देण्यात आली. भाजपाचाच विचार केला तर राधाकृ्ष्ण विखे पाटील, पंकजा मुंडे, गिरीश महाजन यांना मोठा धक्का बसला आहे. एकप्रकारे या नेत्यांचं राजकीय वजन कमी करण्याचाच प्रयत्न या माध्यमातूम झाल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. दरम्यान, हिवाळी अधिवेशनातील एका भाषणात अजित पवार गिरीश महाजनांना उद्देशून म्हणाले होते की गिरीश आता तरी सुधर रे, कट होता होता वाचलास अशी टोलेबाजी केली होती ती आता खरी ठरल्याचे दिसत आहे.

फडणवीसांच्या मंत्रिमंडळात नवखे मंत्री आणि वजनदार खातेही; दिग्गजांना मोठा झटका

महायुतीच्या मंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर लगेचच हिवाळी अधिवेशन सुरू झालं होतं. त्यामुळे या मंत्र्यांना खातेवाटप करता आलं नाही. मात्र काल अधिवेशन संपताच खातेवाटप जाहीर करण्यात आलं. या खातेवाटपाचं वैशिष्ट्य म्हटलं तर ज्यांना मंत्रि‍पदाचा फारसा अनुभव नाही अशा आमदारांना मोठी खाती दिली आहेत. काही माजी मंत्र्यांची जुनीच खाती त्यांच्याकडे कायम ठेवली आहेत. तर काही माजी मंत्र्‍यांची राजकीय ताकद कमी करण्याचाही प्रयत्न झाला आहे.

पंकजा मुंडेंना जुनं खातं नाहीच

यामध्ये भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना धक्का बसल्याचं दिसत आहे. २०१४ मधील युती सरकारच्या काळात पंकजा मुंडे महिला व बालविकास खात्याच्या मंत्री होत्या. परंतु, नंतर महाविकास आघाडी सरकारच्या काळात हे खातं अदिती तटकरे यांना मिळालं होतं. पुढील महायुती सरकारच्या काळातही तटकरे यांच्याकडेच हे खातं होतं. त्यामुळे आताच्या सरकारमध्ये अदिती तटकरे यांनाच पुन्हा हे खातं मिळालं. तर दुसरीकडे पंकजा मुंडे यांना मात्र पशुसंवर्धन खातं मिळालं आहे.

विखे जलसंपदा मंत्री पण खात्यातही विभागणी

शिंदे सरकारमध्ये राधाकृष्ण विखे पाटील महसूल खात्याचे मंत्री होते. अर्थ खात्यानंतरचं महत्वाचं खातं म्हणून महसूलकडे पाहिलं जातं. यंदाही हे खातं विखे पाटील यांनाच मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु, यंदा भाजपने चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हाती महसूलच्या चाव्या दिल्या. तर विखे पाटील यांनी जलसंपदा खातं देण्यात आलं तेही विभागून. तसेच त्यांच्याकडील आधीची दोन खातीही काढून घेण्यात आली आहेत. आता विखे पाटील यांच्याकडे गोदावरी आणि कृष्णा खोरे विकास महामंडळाचा कारभार असेल.

मोठी बातमी ! मंत्रीमंडळाचे खातेवाटप जाहीर, बावनकुळेंकडे महसूल खातं

महाजनही अर्ध्या खात्याचे मंत्री

भाजपाचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे गिरीश महाजन यांनाही या खातेवाटपात धक्का बसला आहे. शिंदे सरकारच्या काळात त्यांच्याकडे ग्रामविकास आणि पर्यटन अशी दोन मोठी खाती होती. आता ही दोन्ही खाती त्यांच्याकडून काढून घेण्यात आली आहेत. याऐवजी त्यांना जलसंपदा खातं मिळालं आहे. पण यातही फक्त विदर्भ आणि तापी खोऱ्याचा कारभार त्यांच्याकडे देण्यात आला आहे. तसेच आपत्ती व्यवस्थापनाची जबाबदारी त्यांना मिळाली आहे.

शंभूराज देसाईंच्या खात्याचे मंत्री अजितदादा

शिंदे सरकारच्या काळात शंभूराज देसाई यांच्याकडे उत्पादन शुल्क विभागाचा कारभार होता. राज्य सरकारला महसूल मिळवून देणारं हे एक महत्वाचं खातं आहे. परंतु, यावेळी शिंदेंना हा विभाग आपल्याकडे राखता आला नाही. खातेवाटपात अजित पवार या खात्याचे मंत्री झाले आहेत. तर शंभूराज देसाई यांना पर्यटन, खाण आणि स्वातंत्र्यसैनिक कल्याण मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube