उमेदवारी न बदलल्यास…, इशारा देत मुंडे व दौंड यांनी राजळेंविरोधात थोपटले दंड

उमेदवारी न बदलल्यास…, इशारा देत मुंडे व दौंड यांनी राजळेंविरोधात थोपटले दंड

Maharashtra Election 2024 : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यास काही दिवस बाकी असतानाच शेवगाव- पाथर्डी मतदारसंघात (Shevgaon- Pathardi constituency) भारतीय जनता पक्षांतर्गत (BJP) उमेदवारीवरून मोठी दुफळी दिसून येत आहे. पंचायत समितीचे माजी सभापती गोकुळ दौंड तसेच भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे (Arun Munde) यांनी पाथर्डीमध्ये निर्धार मेळाव्याच्या निमित्ताने आमदार राजळे (Monika Rajale) विरोधकांना एकत्र करत या निवडणुकीत पक्षाने उमेदवार बदलावा अशी मागणी केली.

आमदार राजळे या आमच्या बहिणी प्रमाणे आहेत, त्या दोन वेळेस आमदार झाल्या आहेत. आता त्यांनी थांबून आपल्या भावांचा विचार करावा अशा मागणी गोकुळ दौंड आणि अरुण मुंडे यांनी केली आहे. गेले अनेक वर्ष शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघात तीन प्रस्थापित कारखानदार कुटुंबाचे वर्चस्व असून इतर कार्यकर्त्यांना सत्तेमध्ये कोणतीही संधी मिळत नसल्याची खंत निर्धार मेळाव्याच्या निमित्ताने व्यक्त करण्यात आली. मात्र आता मतदारसंघातील जनताच जागृत झाली असून त्यांनी प्रस्थापितांना नाकारून नव्या उमेदवारांना संधी देण्याचे ठरवले आहे आणि त्यासाठीच मतदारांनी निर्धार मेळावा आयोजित केला असल्यास गोकुळ दौंड यांनी सांगितले.

मतदार संघातील ग्रामपंचायतपासून जिल्हा परिषद, पंचायत समिती, आमदारकी, खासदारकी या सर्व पदांसाठी एका विशिष्ट कुटुंबांनी सर्व पदे आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न आतापर्यंत केला आहे. त्यामुळे या प्रस्थापितांविरोधात जनतेमध्ये मोठा रोष असल्याने निर्धार मेळाव्याला शेवगाव पाथर्डी तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे अनेक नेते, सरपंच नगरसेवक,कार्यकर्ते उपस्थित असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

आम्ही पक्षाकडे उमेदवारी मागितलेली असून पक्षाचे वरिष्ठ नेते निश्चितपणे आमच्या उमेदवारीबद्दल विचार करतील अशी आशा दौंड यांनी व्यक्त केली. भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी जर उमेदवारी दिली नाही तर त्याबाबत विचार केला जाईल असा इशारा दौंड यांनी दिला आहे. आम्ही भारतीय जनता पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहोत.

देवेंद्र फडणवीस अडचणीत, ‘व्होट जिहाद’ प्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार

निवडणुकीत आम्ही पक्षाचे काम करू मात्र उमेदवारी न बदलल्यास जनता विद्यमान लोकप्रतिनिधीला पराभूत करेल असा दावा गोकुळ दौंड आणि अरुण मुंडे यांनी केला आहे. निर्धार मेळाव्याच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षात शेवगाव पाथर्डी मतदारसंघात मोठी दुफळी निर्माण झाल्याचे आता स्पष्टपणे समोर आले असून उमेदवारी बाबत वरिष्ठ पक्ष नेतृत्वासमोर मोठे आव्हान असल्याचे सध्या तरी चित्र आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube