बंगालच्या उपसागरातील डीप डिप्रेशनचा प्रभाव; महाराष्ट्रासह ‘या’ राज्यांना पावसाचा इशारा

Maharashtra Rain Alert महाराष्ट्रात 23 ते 25 सप्टेंबर दरम्यान अनेक भागांत पावसाची शक्यता असून काही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

Maharashtra Rain Alert

Maharashtra Rain Alert: बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. या प्रणालीची तीव्रता वाढत असून पुढील काही तासांत तिचे डीप डिप्रेशनमध्ये रूपांतर होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर देशातील 13 राज्यांना हलका ते मुसळधार पाऊस आणि काही भागांत अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. प्रणालीच्या प्रभावामुळे वाऱ्याचा वेग ताशी 75 किलोमीटरपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

करार करा नाहीतर कठोर कारवाईला सामोरं जा; इराणला डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा

दरम्यान, बंगालच्या उपसागरातील ही प्रणाली आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टीच्या दिशेने सरकत आहे. आज या भागात तिचा परिणाम अधिक जाणवण्याची शक्यता असून दक्षिण ओडिशा आणि उत्तर आंध्र प्रदेशच्या किनारी भागात जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस होऊ शकतो. समुद्र खवळलेला राहण्याची शक्यता असल्याने मच्छीमारांनी समुद्रात जाणे टाळावे, असा सल्ला देण्यात आला आहे.

या हवामान प्रणालीमुळे ओडिशात 23 ते 24 सप्टेंबर, तर छत्तीसगड आणि तेलंगणात 23 ते 24 सप्टेंबरदरम्यान मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. किनारी आंध्र प्रदेशातही 22 ते 23 सप्टेंबरदरम्यान जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. ओडिशा, आंध्र प्रदेश आणि छत्तीसगडच्या काही भागांत मुसळधार पावसामुळे स्थानिक पातळीवर पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

विठ्ठल रुक्मिणी मंदिर तीन दिवस बंद; मूर्तींच्या संवर्धनासाठी आजपासून रासायनिक लेपन

दरम्यान, उत्तर-पश्चिम भारतातील पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, हिमाचल प्रदेश आणि पश्चिम उत्तर प्रदेशातील काही भागांत मान्सूनच्या परतीसाठी पोषक परिस्थिती तयार होत आहे. त्यामुळे एका बाजूला मान्सूनच्या परतीचे संकेत मिळत असताना दुसरीकडे बंगालच्या उपसागरातील सक्रिय प्रणालीमुळे पूर्व आणि मध्य भारतातील पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रातही पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागांत मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज आहे. 24 आणि 25 सप्टेंबरला विदर्भातील काही भागांत अतिमुसळधार पाऊस, तर मराठवाड्यातही जोरदार पावसाची शक्यता आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रातही काही जिल्ह्यांत मुसळधार सरी आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडू शकतो. त्यामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांनी स्थानिक हवामान विभागाच्या सूचनांकडे लक्ष देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

National Film Awards : अहिल्यानगरचा देशात डंका ! राष्ट्रपतींच्या हस्ते ‘हमसफर’ लघुपटाला ‘रजत कमल’ पुरस्कार प्रदान

महाराष्ट्रात कुठे पाऊस?

महाराष्ट्रात आज अनेक भागांत पावसाची शक्यता असून काही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भ, मराठवाडा आणि कोकणातील काही भागांत मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि जोरदार सरी पडू शकतात. धाराशिव, लातूर आणि नांदेड या मराठवाड्यातील जिल्ह्यांसह यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली येथे पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. या भागांत काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस पडू शकतो. कोकणात रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज आहे. दरम्यान, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, अहिल्यानगर आणि सोलापूर येथे तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. राज्यातील बहुतांश भागात ढगाळ वातावरण राहणार असून काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो.

विधानपरिषदेला पानसरेंना साथ देणे नडले ? बाळासाहेब नाहाटांना राज्य बाजार संघाच्या सभापतीपदावरून हटविले

दरम्यान, मान्सूनच्या परतीसाठी उत्तर-पश्चिम भारतातील काही भागांत परिस्थिती अनुकूल होत असली, तरी बंगालच्या उपसागरातील सक्रिय हवामान प्रणालीमुळे देशाच्या पूर्व आणि मध्य भागातील पावसाचा जोर काही काळ कायम राहण्याची शक्यता आहे.

follow us